जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमद्ये वाढ होताना दिसत असून अशातच एसटी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना एरंडोल येथील बस स्थानकाजवळ घडली. विजय सांडू पाटील (वय ५८, रा. जवखेडे बुद्रुक, ता. एरंडोल) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवखेडे बुद्रुक येथील रहिवासी असलेले विजय पाटील हे जामनेर-बोदवड परिसरात एका नातेवाईकाच्या लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न आटोपून घरी परतत असताना, ते आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १९ ए.व्ही. ४७६३) एरंडोल बस स्थानकाजवळील समांतर रस्त्यावरून जात होते. याच वेळी बस स्थानकापासून काही अंतरावर जळगावच्या दिशेने जाणाऱ्या बुलढाणा आगाराच्या धुळे-बुलढाणा बसने (क्रमांक एमएच १४ बीटी ४९८०) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गंभीर दुखापत झाल्याने विजय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. एरंडोल पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनेचा पंचनामा सुरू केला. मृत विजय पाटील हे परिसरातील प्रगतीशील शेतकरी म्हणून परिचित होते, तसेच जवखेडे बुद्रुकचे पोलीस पाटील दिनकर पाटील यांचे ते बंधू होत.










