एरंडोलच्या एकाच कुटुंबातील भाविकांच्या कारला नाशिकजवळ भीषण अपघात; वृद्धेचा जागीच मृत्यू, २ गंभीर

मे 24, 2026 10:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । सप्तश्रृंगी गडावरील देवीचे दर्शन आटोपून त्र्यंबकेश्वरकडे जात असताना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील एकाच कुटुंबातील ११ भाविकांच्या कारला नाशिकजवळील म्हसरूळ परिसरात भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत ७२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. कमळाबाई रामदास सूर्यवंशी (७२) असं मृत वृद्धेचे नाव असून या घटनेत अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. कारमधील इतर प्रवाशांनाही दुखापत झाली आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील सूर्यवंशी आणि विश्वे कुटुंबातील ११ सदस्य कारने (क्र. MH 46 AL 5126) सप्तश्रृंगी गडावर देवदर्शनासाठी गेले होते. शनिवारी सकाळी गडावरील दर्शन आटोपून हे कुटुंब त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी निघाले. सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांची कार नाशिकमधील म्हसरूळ परिसरात आली असता, अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. वेगवान कार रस्त्याशेजारील झाडावर प्रचंड वेगाने जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या दर्शनी भागाचा पार चक्काचूर झाला.

एका महिलेचा मृत्यू, दोन गंभीर

या भीषण अपघातात कारमधील कमळाबाई सूर्यवंशी यांचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तसेच वैशाली उमेश धुमावकर (वय ३३) आणि शोभाबाई धोंडू विश्वे (वय ५४) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारमध्ये विजय रामदास सूर्यवंशी (४०), संगीता सूर्यवंशी (३२), धोंडू विश्वे (७०), उमेश कडू धुमावकर (३८), श्रद्धा सूर्यवंशी (१५), मोहित सूर्यवंशी (१३), युग दमायकर (७), आणि देवेश दमायकर (१२) हे देखील प्रवास करत होते. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे एरंडोल परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत नाशिकमधील म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now