जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा परिसरात कृषी विभागाने सापळा रचून हाती प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत बियाणे आणि चारचाकी वाहनासह एकूण १० लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

कासोदा परिसरात विनापरवाना आणि केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेल्या HTBT कापूस बियाण्यांची चोरटी वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने परिसरात पाळत ठेवून सापळा रचला. संशयास्पद वाटणारी एक चारचाकी गाडी अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बियाण्यांची पाकिटे आढळून आली.

या धडक कारवाईत पथकाने ४ लाख ८० हजार रुपये किमतीची HTBT कापूस बियाणे आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी असा १० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस आणि कृषी विभागाचे अधिकारी करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत याचा शोध घेतला जात आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी कारवाईचे सत्र
HTBT बियाणे हे भारतात लागवडीसाठी प्रतिबंधित आहे, तरीही काही समाजकंटक छुप्या पद्धतीने याची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. अशा बियाण्यांमुळे जमिनीचा पोत बिघडण्याची आणि कायदेशीर कारवाई होण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने केलेली ही कारवाई अवैध बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणणारी ठरली आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता अधिकृत दुकानातूनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.








