Sharad Pawar on Shinde Sarkar : नवनिर्वाचित शिंदे सरकार सहा महिन्यात कोसळेल यामुळे सर्वांनी मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे. शिंदे सरकारची सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात राज्यातील सद्यस्थितीची आढावा घेण्यात आला. या बैठकीला संबोधीत करतांना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने त्यांनी सर्व नेत्यांनी तयारीला लागल्याचे निर्देश दिले.
महाराष्ट्रातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार फक्त पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळें तयारी आत्तापासून करा.