जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२५ । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील मुक्ताई बंगल्यावर चोरी झाली. यात चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिन्यांसह 35 हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर आज एकनाथ खडसे हे जळगावमध्ये दाखल झाले. त्यांनी घरात काय काय चोरीला गेले याचा आढावा घेतला. यांनतर खडसे यांनी पत्रकारांसाठी संवाद साधताना एक खळबळजनक दावा केला. चोरांनी घसरातून सोने-चांदीचे दागिनेचं नाही तर सीडी, पेनड्राईव्ह आणि काही महत्वाची कागदपत्रे चोरी केल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली.

आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावात शिवराम नगर येथील निवासस्थानी चोरी झाल्याची घटना घडली आहे. यानंतर आज एकनाथ खडसे हे मुंबईहून जळगाव येथे चोरी झालेल्या घराच्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या घरातून सोने,चांदी यासह महत्वाची कागदपत्रं ,पेन ड्राइव्ह आणि काही महत्वाच्या सीडी ही चोरीस गेल्याच दिसून आले.

या चोरीच्या घटनेबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्द पद्धतीने रेकी करून माझ्या घरातली भ्रष्टाचारा संदर्भातली महत्त्वाची कागदपत्र तसेच महत्त्वाच्या सीडी, पेन ड्राईव्ह चोरून नेण्यासाठीच झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. चोरट्यांनी दहा सीडीज चोरूल्या असून उर्वरित सात सीडीज शिल्लक आहेत तर घरातले सर्व 25 ते 30 पेन ड्राईव्ह देखील चोरून नेल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
आपल्या घरातील चोरीवेळी चोरट्यांनी कागदपत्र आणि सीडी चोरून नेण्यामागे चोरट्यांचा काय उद्देश होता, याचा देखील तपास पोलिसांनी करायला हवा, असंही खडसे म्हणाले. आपल्या घरात कुठे काय ठेवले आहे, याची माहिती असल्याशिवाय अशी महत्वाची कागदपत्रं कोणी चोरून नेऊ शकत नाही. चोरी करण्यापूर्वी आपल्या घराच्या परिसरातील लाईट बंद होते. त्यानंतर चोरी होते, याचा ही पोलिसांनी तपास करायला हवा, अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.
ज्या पद्धतीने ही चोरी झाली ती कुणाच्या सांगण्यावरून ही चोरी झाली का? आत्ताच मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही, आक्षेप सुद्धा मी घेणार नाही, असे देखील खडसे यांनी म्हटले आहे. चोरट्यांचा केवळ चोरी करणे हा उद्देश नव्हता तर माझ्या घरातली कागदपत्र पेन ड्राईव्ह सीडी सोडून नेण्याचाच उद्देशाने ही चोरी झाल्याचा दावा खडसेंनी केला आहे.











