जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात आज सोमवार, ४ मे रोजी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत शहरातील अतिक्रमण, नालेसफाई, कचरा संकलन, शाळांची स्थिती आणि डिझेल खरेदी यांसारख्या विविध प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांवरून नगरसेवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. विशेष यावेळी एक मोठी घोषणा करण्यात आलीय. मनपा शाळांमध्ये ‘सेमी इंग्लिश’ माध्यम सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी केली.

या बैठकीला मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त पंकज गोसावी, उपायुक्त निर्मला गायकवाड आणि नगरसचिव सतीश शुक्ला यांच्यासह सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून जळगाव येथील जैन मंदिराभोवतीचे अतिक्रमण हटवण्याच्या थेट सूचना दिल्या होत्या. तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई का झाली नाही? मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरही कारवाई होणार नसेल तर आम्ही आंदोलन करायचे का?” असा संतप्त सवाल शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांनी उपस्थित केला.
शहरातील सुभाष चौक, महात्मा फुले मार्केट परिसरातील अतिक्रमणाकडे लक्ष वेधत विष्णू भंगाळे यांनी संडे बाजारामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला. सुट्टीच्या दिवशी अतिक्रमण विभागाचे फोन बंद असतात, असा आरोप त्यांनी केला. यावर उपायुक्त पंकज गोसावी यांनी, आता सुट्टीच्या दिवशीही गस्ती पथक तैनात करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मनपा शाळांमध्ये ‘सेमी इंग्लिश’ सुरू होणार!
मनपा शाळांमधील घटत्या पटसंख्येबाबत सदस्यांनी चिंता व्यक्त केली. शाळांच्या इमारती चांगल्या असतानाही विद्यार्थी संख्या का कमी होत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तोडगा काढत, आगामी शैक्षणिक वर्षापासून मनपा शाळांमध्ये ‘सेमी इंग्लिश’ माध्यम सुरू करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी केली. यामुळे शाळांचा दर्जा उंचावेल आणि पालकांचा कल मनपा शाळांकडे वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रिक्षा चालकांच्या मनमानीला चाप बसवा: नितीन लढ्ढा
सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी शहरातील वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधले. अधिकृत थांबे असतानाही अनेक रिक्षा चालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. अनेक रिक्षा चालकांची नोंदणी नसल्यामुळे समस्या अधिक गंभीर होत असून अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
कचरा संकलनातील दिरंगाई; ‘बीव्हीजी’ला ५४ लाखांचा दंड!
नगरसेवक अरविंद देशमुख यांनी कचरा संकलनातील अनियमितता आणि खासगी शाळांच्या जागांच्या कराराचा मुद्दा उपस्थित केला. सेंट जोसेफ, उज्ज्वल स्कूल आणि विद्या इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांचा मनपासोबतचा करार संपलेला असतानाही त्यांनी जागांवर प्रवेशासाठी पैसे गोळा केल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरात कचरा संकलन नीट होत नसल्याने, आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी माहिती दिली की, आतापर्यंत बीव्हीजी कंपनीला ५४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पावसाळा जवळ आला असतानाही नालेसफाईचे नियोजन अद्याप पूर्ण न झाल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. यावर प्रशासनाने सांगितले की, आरोग्य विभागाकडून प्रस्ताव बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला असून, येत्या २ ते ३ दिवसांत टेंडर काढून कामाला सुरुवात केली जाईल.
डिझेल खरेदी आणि जीपीएसचा घोळ; सभापतींचे कारवाईचे निर्देश
इंधन भरणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसवण्याच्या सूचना दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न झाल्याने सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देत, वाहनांच्या इंधन खर्चाबाबतचा सविस्तर अहवाल पुढील सभेत सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.










