जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२५ । जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले. ते बऱ्याच दिवसापासून आजारी होते आणि त्यांना दिल्लीच्या (आरएमएल) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज मंगळवारी सकाळी त्यांनी आरएमएल रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

सत्यपाल मलिक यांच्या सोशल मीडिया अकाउंट x वर त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. अधिकृत माहितीनुसार, सत्यपाल मलिक यांना किडनीचा त्रास होता. सत्यपाल मलिक यांना मे महिन्यात मूत्रमार्गाच्या गंभीर संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. यानंतर उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांची प्राणज्योत मालवली.

सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात झाला.१९८० ते १९८९ पर्यंत त्यांनी राज्यसभेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. १९८९ ते १९९१ पर्यंत ते जनता दलाचे सदस्य म्हणून अलिगड येथून नवव्या लोकसभेचे खासदार होते. त्यानंतर सत्यपाल मलिक यांनी ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे राज्यपाल म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. ते जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपाल होते.











