
जळगाव लाईव्ह न्यूज । वयाच्या ८३व्या वर्षी अचानक आलेल्या गंभीर मेंदूविकारावर मात करत भाऊराव यांनी अक्षरशः मृत्यूशी दोन हात केले. घरात पडल्यामुळे झालेल्या दुखापतीनंतर काही दिवस उपचार घेऊन प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वाटत असतानाच अचानक डावा हात-पाय कमजोर पडून त्यांना शुद्ध हरपली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. येथे मेंदूविकार तज्ज्ञांनी वेळेत केलेल्या निदानामुळे त्यांच्यावर तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. व्हेंटिलेटरवर उपचार घेणार्या भाऊराव यांनी अखेर मृत्यूवर मात करत सुखरूप घरी परतण्याचा अनुभव घेतला.

महिनाभरापूर्वी भाऊराव खिरडकर (वय ८३) हे घरात पडले होते. त्यानंतर त्यांनी तात्पुरता उपचार घेतला. काही दिवस त्यांना बरे वाटत असल्याने कुटुंबीयांनीही दिलासा घेतला होता. मात्र अचानक त्यांच्या डाव्या हात-पायाची हालचाल कमी झाली आणि त्यांची शुद्ध हरपली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी विलंब न करता त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात दाखल केल्यानंतर मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी भाऊराव यांची तपासणी केली. तातडीने सीटी स्कॅन करण्यात आला. या तपासणीत मेंदूमध्ये अतिरक्तस्राव झाल्याचे निदान झाले. रुग्णाचे वय ८३ वर्षे असल्याने परिस्थिती अत्यंत नाजूक होती. मात्र वेळ न दवडता शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.यानंतर डॉ. विपूल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोन तासांची फ्रन्टल अॅन्ड पॅरायटल क्रेनिओटोमी शस्त्रक्रिया करण्यात आली. मेंदूमध्ये साचलेले रक्त बाहेर काढून मेंदूवरील दबाव कमी करण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. अनुष्का, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश, डॉ. साक्षी, डॉ. ललिता यांनी सहकार्य केले. शस्त्रक्रियेनंतर भाऊराव यांना काही काळ व्हेंटिलेटरवर ठेवून अतिदक्षता विभागात उपचार व निरीक्षण करण्यात आले.

भाऊरावांची आव्हांनावर मात
वय, मेंदूतील रक्तस्राव आणि शस्त्रक्रियेनंतरची गंभीर अवस्था या सर्व आव्हानांवर मात करत भाऊराव यांच्या प्रकृतीत हळूहळू स ुधारणा होऊ लागली. डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण उपचारांसह अतिदक्षता विभागातील वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नांना यश आले. अखेर व्हेंटिलेटरवरील उपचारातून बाहेर येत भाऊराव यांनी स्वतःच्या पायावर घरी परतण्याचा आनंद कुटुंबीयांना दिला. या संपूर्ण उपचाराचा लाभ संबंधित शासकीय आरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया व उपचार मिळाल्याने कुटुंबीयांवरील आर्थिक भारही कमी झाला.
मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होऊ शकते. अशावेळी वेळेत निदान आणि आवश्यकतेनुसार तातडीने शस्त्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे असते. भाऊराव यांचे वय अधिक असूनही वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे योग्य उपचार करता आले. शस्त्रक्रियेनंतर त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली. मात्र उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यांची प्रकृती सुधारली आणि ते सुखरूप घरी परतले.
- डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.






