⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

बेवारस महिलेच्या अंत्यविधीसाठी सरसावली माणुसकी समूहाची टीम

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२२ । फर्दापुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये बस स्टाॕप परिसरात काही महिन्यांपासून एक महिला बेवारस अवस्थेत फिरत होती, परंतु गेल्या काही दिवसापासून तीची प्रकृती गंभीर झाल्याने फर्दापुर’ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी माणुसकी समूहाचे गजानन क्षीरसागर यांना फोन करून त्या बेवारस महिला पेशंट ची माहिती दिली. दि. ४ रोजी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात जळगाव मध्ये दाखल केले होते.परंतु उपचारादरम्यान दि. १० रोजी दुर्दैवाने ती महिला मयत झाली. मृत्यूनंतर जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश चौधरी यांनी , मयताची माहिती माणुसकी समुहाला दिली. मयताची ओळख पटविण्या करीता शासकीय रुग्णालयात शवगृहात ठेवले असता सदरील मयताचे ओळख पटली नाही त्याचे कोणीच नातेवाईक नाही ही बाब समोर आली,तीन दिवसानंतर मयताचे आज अंत्यविधीसाठी पोलीसांना माणुसकी समूहाच्या टिम ने सहकार्य केले.

शासकीय रुग्णालयातील पीएम रूम मधून मयताची बॉडी खाजगी ॲम्बुलन्स ने अंत्यविधीसाठी नेरी नाका स्मशानभूमी येथे नेऊन अंतिमसंस्कार करण्याचे ठरवण्यात आले.अंत्यविधीसाठी पोलीस निरीक्षक एमआयडीसी जळगाव प्रतापसिह शिकारे,पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश चौधरी,पोलीस कॉन्स्टेबल अतुल पाटील,राजू नाईक,अनिल नाईक,बागवान,समाजसेवक गजानन क्षीरसागर, समाजसेवक सुमित पंडित,राजू नाईक,दिलीप नाईक,व माणुसकी समुहाच्या व्हाट्सअॕप ग्रुप मधील सभासदांनी अंत्यविधीसाठी आर्थिक मदत जमा करुन, मदतकार्य केले.

माणुसकी समुह कितीतरी गोरगरिबांना अहोरात्र मदत करत आलेला आहे. आतापर्यंत बऱ्याच बेवारस रुग्णांचे अत्यसंस्कार आमच्या माणुसकी समुहाने केलेले आहे. नेरी नाका परिसरातील स्मशान भूमी मध्ये महानगरपालिके कडून कचरा तिथेच टाकला जातो तो तिथे न टाकता दुसरीकडे जागा शोधावी, कारण तिथे जागा कमी असल्याने फारच अडचण निर्माण झाली आहे. असे मत माणुसकी समुहाचे समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी व्यक्त केले.