जळगावात बंदी असलेल्या गुटख्याची चढ्या दराने विक्री

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ एप्रिल २०२३ | जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिनधास्त गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. दर महिन्याला लाखोंचा गुटखा पकडला जात असताना देखील पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. जळगावातील रेल्वे स्थानक परिसरातील एका गुटखा विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जात आहे. अनेक मातब्बर माफिया गुटखा विक्रीत सक्रिय झाले असून त्यांच्याकडून प्रशासनाला दरमहा लाखोंचा हफ्ता दिला जात असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी एलसीबीच्या नावाने व्हायरल होत असलेल्या एका यादीत भाटिया शिखर गुटखा दिल्ली, हंसू शेठ, पंकज सुपारी, सुशील गुटखा सिंधी, विकी बऱ्हाणपूर गुटखा, जेसवानी गुटखा जळगाव अशी अनेक नावे आणि लाखोंचे आकडे देखील होते. जळगावात गेल्या वर्षभरात किमान ८ ते १० ट्रक गुटखा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने पकडला आहे.

जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बिनधास्त गुटखा आणून विक्री केली जात असल्याचे या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. एक तर चोरी आणि वर शिरजोरी असा काहीसा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. जळगावात अनेक ठिकाणी दिवस रात्र गुटखा विक्री केली जात असून त्यातही चढ्या दराने विक्री होत आहे. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका पान टपरी चालकाचा असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून थैल्या भरून बिनधास्त गुटखा विक्री केली जात असल्याचे त्यात दिसत आहे.

शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच अनेक ठिकाणी बिनधास्त गुटखा विक्री होत असताना पोलीस हातावर हात धरून बघ्याची भुमिका घेत आहेत. केवळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुटखा विक्री केली जात आहे. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात संयुक्त मोहीम राबविल्यास गुटखा माफियांना आळा घालण्यात यश येऊ शकते.