⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

ग्लोबुसेलच्या २२० इंजेक्शनची विक्री, दाेघांविरुद्ध गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । औषध खरेदी-विक्रीचा परवाना नसताना औषध विक्री केल्याची बनावट बिले तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आल्याने, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना २० ऑक्टोबर ते १ नाेव्हेंबरदरम्यान जोगेश्वरी फार्मा, चाळीसगाव आणि चंदिगड येथे घडली आहे.
ग्लोबुसेल औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, बॅक्टेरियल व व्हायरल इन्फेक्शनच्या उपचारासाठी वापरले जाते. एका इंजेक्शनची किंमत १० ते १५ हजार रुपये आहे. असे असताना चाळीसगाव शहरातील घाटे कॉम्प्लेक्समधील जोगेश्वरी फार्माचे मालक जितेंद्र प्रभाकर खोडके (रा. कळमडू, ता. चाळीसगाव) यांनी, परवाना नसताना, तसेच ग्लोबुसेल इंजेक्शन उत्पादन करणारी इंटास फार्मासिटिकल कंपनीने जाेगेश्वरी फार्मा यांना, ग्लोबुसेल इंजेक्शन (बॅच नं.९७१३००७२) हे विक्री केलेले नसताना, गैरमार्गाने २२० व्हायल मिळवल्या होत्या.

त्या औषध खरेदी-विक्रीचा परवाना नसलेल्या सुनील ढाल यांच्या मालकीच्या श्री क्रिढा इंटरनॅशनल हेल्थकेअर कंपनीला (युनिट नंबर २१, १३ वा मजला, सुषमा इन्फिनियम, निअर बेस्ट प्राइस, जि. झेरकपूरख सासनगर) विकल्या. तसेच खरेदी-विक्रीची बनावट बिले तयार केली. औषध निरीक्षक डॉ.अनिल माणिकराव यांच्या तक्रारीवरून जितेंद्र प्रभाकर खोडके व सुनील ढाल (रा.हाऊस नंबर १३८, राजव्हिला, डेराबस्सी, पंजाब) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जिल्ह्यातील बहुदा हा पाहिलाच गुन्हा असावा.