⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

रोहित शर्माला सोडावं लागणार कर्णधारपद, बीसीसीआय करतेय ‘हा’ विचार..

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । नुकतेच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. तसेच त्यापूर्वी खेळल्या गेलेल्या सामन्यात देखील भारतीय टीमची दमदार कामगिरी दिसून आली नाही. T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलनंतर सातत्याने कॅप्टन बदलण्याची मागणी होत आहे. पुढचा टी २० वर्ल्ड कप दोन वर्षांनी २०२४ मध्ये होणार आहे. तेव्हा रोहित शर्माच वय ३७ वर्ष असेल, त्यामुळे आतापासून टी २० ची धुरा नव्या कर्णधाराकडे सोपवावी, असा भारतीय क्रिकेटमध्ये मतप्रवाह आहे.

साइड स्पोर्ट्ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंड विरुद्ध टी २० सीरीजसाठी हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवण्यात आले. त्यालाच कायमस्वरुपी कर्णधार बनवण्याची मागणी होत आहे. तसेच हार्दिक पंड्याला पुढेही कायम ठेवण्यावर निवड समिती सदस्यांमध्ये यावर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे एकंदरीत रोहित शर्माला टी २० चे कर्णधारपद गमवावे लागण्याची शक्यता आहे. जानेवारीत होणाऱ्या श्रींलेकविरुद्धच्या तीन टी २० सामन्याच्या सीरीजपूर्वी हार्दिक पंड्याची कायमस्वरुपी टी २० कर्णधारपदी नियुक्तीची घोषणा होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.

तूर्तास तरी वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा कायम राहणार असल्याचे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले आहे. रोहित शर्मा आणखी बरेच योगदान देऊ शकतो. पण तो आता तितका तरुण राहिलेला नाही. २०२४ टी २० वर्ल्ड कपसाठी आतापासून तयारी करावी लागेल. पुढील कर्णधार म्हणून हार्दिक त्यासाठी एकदम फिट आहे असे सर्वांचे मत आहे. समिती सदस्य भेटून पुढच्या टी 20 सीरीजआधी कॅप्टन म्हणून हार्दिकच्या नावाची घोषणा करतील असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले आहे.

रवी शास्त्री म्हणाले कि, आज तरी टी 20 क्रिकेटमध्ये नवीन कर्णधार निवडण्यात कुठलाही धोका नाही. सध्या क्रिकेट सामन्यांचे प्रमाण बघता, एका खेळाडूसाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार म्हणून खेळणे सोपे नाही. रोहित कसोटी आणि वनडेमध्ये नेतृत्व करत असेल, तर टी 20 साठी नवीन कर्णधार निवडण्यात काहीही धोका नाही. हार्दिक पंड्या पुढील कर्णधार असला तरी काहीही अडचण नाही, असे रवी शास्त्री म्हणाले.