भुसावळ

भुसावळमध्ये दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम; ४ पोलीस ठाण्यांचा सहभाग

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मॉक ड्रिल; दगडफेक, लाठीमार आणि अश्रुधुराच्या वापराचे प्रात्यक्षिक

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरात आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम घेतली. शहरातील गवळीवाडा परिसरातील नाटकर चौकात सुमारे १ तास ४५ मिनिटे चाललेल्या या मॉक ड्रिलमध्ये अचानक दंगल उसळल्यास किंवा जमावाकडून दगडफेक झाल्यास परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती पावले उचलायची, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले.

सकाळी ११ ते दुपारी १२.४५ या वेळेत झालेल्या या सरावात भुसावळ शहर, बाजारपेठ, भुसावळ तालुका आणि नशिराबाद या चार पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १० अधिकारी, ४० पोलीस अंमलदार, आरसीपी दंगल नियंत्रण पथक, कार्यकारी दंडाधिकारी, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

अचानक दंगल उसळल्याचा काल्पनिक प्रसंग

नाटकर चौक परिसरात अचानक जमाव जमणे, दगडफेक सुरू होणे आणि परिस्थिती तणावपूर्ण बनणे, असा काल्पनिक प्रसंग तयार करण्यात आला. त्यानंतर मुख्य नियंत्रण कक्षाला तातडीने संदेश देण्यात आला. माहिती मिळताच संबंधित पोलीस पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस किती वेळात घटनास्थळी पोहोचतात, प्रतिसाद देण्यास किती वेळ लागतो आणि दंगल नियंत्रण पथक कशा पद्धतीने हालचाल करते, याची नोंद घेण्यात आली.

लाठीमार, अश्रुधूराच्या वापराचे प्रात्यक्षिक

मिरवणुकीदरम्यान किंवा सण-उत्सवाच्या काळात गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यास तसेच समाजकंटकांकडून दगडफेक झाल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी लाठीमार, अश्रुधुराचा वापर आणि दंगल नियंत्रण यंत्रणेच्या कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. विविध पथकांमध्ये समन्वय राखून जमावाला नियंत्रित करण्यावर या सरावात भर देण्यात आला.

उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या नेतृत्वाखाली सराव

पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या नेतृत्वाखाली ही मॉक ड्रिल पार पडली. नवरात्रोत्सवात गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांनी तातडीने प्रतिसाद देणे, विविध यंत्रणांमध्ये समन्वय राखणे आणि परिस्थिती नियंत्रणात आणणे, या उद्देशाने हा सराव घेण्यात आला. दरम्यान, पोलिसांची रंगीत तालीम पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button