
जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील आलिशान वॉटर पार्कजवळ आज गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत तरुणाच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, एखाद्या वस्तूने वार करून त्याचा घातपात करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असून, फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत.
दरम्यान, तरुणाच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. लुटीच्या उद्देशाने हा प्रकार घडला का, पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला करण्यात आला का, यासह अन्य शक्यतांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही पोलिसांकडून तपासले जात असून, त्यातून संशयित किंवा घटनेबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळतात का, याचा शोध घेतला जात आहे.
मृत तरुणाची ओळख अद्याप अस्पष्ट
मृत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून, बाजारपेठ पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि दुखापतीचे स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
वॉटर पार्कसारख्या गजबजलेल्या परिसराच्या जवळ तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने भुसावळ शहरात चर्चेला उधाण आले आहे. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि त्यामागे घातपात आहे का, याचा उलगडा करण्याचे आव्हान आता बाजारपेठ पोलिसांसमोर आहे.





