जळगाव जिल्हा

जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी! अमरावती-मुंबई एक्स्प्रेस पुन्हा सीएसएमटीपर्यंत धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या ७५ दिवसांच्या ब्लॉक कालावधीत दादरपर्यंतच चालवण्यात येणाऱ्या तीन गाड्या आता पुन्हा सीएसएमटीपर्यंत धावणार आहेत. यामध्ये जळगावमार्गे धावणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचाही समावेश असल्याने जळगावसह मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जळगावच्या प्रवाशांची दादरला होणारी धावपळ वाचणार

सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेबलिंग लाइन क्रमांक १५ वरील कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामांमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने काही लांब पल्ल्याच्या गाड्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच चालवण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मात्र, दादर येथे उतरून पुढील प्रवासासाठी पर्यायी वाहतुकीचा शोध घेणे, त्यासाठी अतिरिक्त खर्च करणे आणि वेळेचा अपव्यय होणे, अशा अडचणी प्रवाशांना येऊ शकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या निर्णयात बदल केला आहे. आता संबंधित तीन गाड्या ब्लॉक कालावधीतही सीएसएमटीपर्यंत धावणार आहेत.

अमरावती-मुंबई एक्स्प्रेसचा प्रवास होणार सोयीचा

जळगावमार्गे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस महत्त्वाची रेल्वेगाडी आहे. या गाडीला पुन्हा सीएसएमटीपर्यंत धावण्याची परवानगी मिळाल्याने प्रवाशांना थेट मुंबईतील प्रमुख टर्मिनसपर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे दादर येथे उतरून पुढील प्रवासासाठी दुसरे साधन शोधण्याची गरज कमी होईल.

सीएसएमटीच्या पुनर्विकासाची कामे सुरू असताना रेल्वेच्या वेळापत्रकात किंवा गाड्यांच्या संचालनात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावसह मार्गावरील प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून संबंधित गाडीचे अद्ययावत वेळापत्रक आणि थांबे तपासून घ्यावेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button