यावलच्या तहसीलदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस! महसूल वर्तुळात खळबळ; नेमकं प्रकरण काय?

मे 8, 2026 12:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यावल तालुक्यातील आमोदे येथील ‘मधुकर’ सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर झालेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि विक्री प्रकरणात निष्काळजीपणा आणि अनियमितता बाळगल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यात आणि महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

yawal tahsil

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज शाखेकडून सादर करण्यात आलेला सविस्तर अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत संबंधित प्रकरणात महसूल विभागाच्या कामकाजात अनियमितता आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे. कार्यालय प्रमुख म्हणून पर्यवेक्षणीय जबाबदारीत कसूर झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने तहसीलदारांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.

या प्रकरणात शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी ३० जानेवारी २०२४ पासून फेब्रुवारी २०२६ पर्यंत सातत्याने तक्रारी सादर करून या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. तसेच आ.राजूमामा भोळे यांनीही या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तक्रारींची दखल घेत प्रशासनाने मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून पंचनामे व संबंधित कागदपत्रांच्या आधारे चौकशी केली.

त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. सखोल दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संपूर्ण प्रकरणाचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अवैध खनिज उत्खननाच्या वाढत्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now