
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रात बंदी असतानाही सुरू असलेल्या अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीवर मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बऱ्हाणपूर-मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गावर एका होंडा सिटी कारमधून तब्बल ३ लाख ९५ हजार ७४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि वाहन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी गजानन राजेंद्र पाटील (वय २६, रा. मेळसावंगी, ता. मुक्ताईनगर) आणि भारत उत्तम भोई (वय २३, रा. मेंढोळदे, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी बऱ्हाणपूर ते मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आरंभसमोर पोलिसांनी सोनरी रंगाच्या होंडा सिटी कारची तपासणी केली. या कारचा क्रमांक एमएच १६ आर ४५७५ असा आहे. तपासणीदरम्यान वाहनामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी विमल पानमसाल्याची पाकिटे आणि व्ही-१ बिग तंबाखूचा साठा जप्त केला. या प्रतिबंधित पदार्थांची किंमत १ लाख ८० हजार ७४० रुपये असल्याचे नोंदविण्यात आले आहे.प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली २ लाख १५ हजार रुपये किमतीची होंडा सिटी कारही पोलिसांनी जप्त केली. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि वाहनाची एकत्रित किंमत ३ लाख ९५ हजार ७४० रुपये आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील करीत आहेत.





