जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । गेल्या काही दिवसापासून उत्सुकता लागलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील जाहीर सभा आज पार पडली आहे. मशिदींवरील भोंग्यांबाबत भूमिका घेत राज यांनी मागील दोन सभांमधून आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आज सभेत त्यांनी खासकरून शरद पवार (Sharad Pawar) आणि मशीदीवरील भोंग्यांना पुन्हा टार्गेट केलं आहे. आज राज ठाकरे यांनी पुन्हा मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यातील ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, यावेळी राज ठाकरे भोंग्यावरून आक्रमकपणे बोलत असतानाच अजान सुरू झाली आणि त्यांनी थेट पोलिसांना आवाहन करत इशारा दिला.
आज तारीख 1, उद्या तारीख 2. 3 तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला कोणत्याही प्रकारचं विष कालवायचं नाही. 4 तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा पुन्हा राज ठाकरेंनी दिला. तसेच हिंदूंना हातजोडून विनंती आहे. जिथे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट हनुमान चालिसा लागली पाहिजे. विनंती करून ऐकत नसेल तर पर्याय नाही. लाऊडस्पीकर तुमच्या धर्मात बसत नाही. असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच आम्हाला सभा घेतना हा सायलन्स झोन आहे. शाळा आहे. रात्री कुठे शाळा असेत. यांना कुठेही. रस्त्यावर उतरून नमाज पढताता. कुणी अधिकार दिला, असा सवालही त्यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार देशातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरले पाहिजेत, मग यात मंदिरांवर असलेले भोंगे देखील उतरले पाहिजेत, मात्र आधी मशिदींवर असलेले भोंगे उतरल्यानंतरच मंदिरांवरील भोंगे उतरतील, अशी भूमिका घेत आपण कायद्याचे पालन करणारे नेते असल्याचे राज ठाकरे यांना आज अधोरेखित केले.
दरम्यान, राज ठाकरे भोंग्यावरून आक्रमकपणे बोलत असतानाच अजान सुरू झाली. त्यामुळे राज ठाकरे थोडे थांबले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना (police) अजान बंद करण्याची विनंती केली. आताच्या आता जाऊन तात्काळ अजान बंद करा. त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. त्यांना सरळ भाषेत कळत नसेल तर काय ते होऊन जाऊ द्या. महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे हे दाखवून देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं. आणि पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारला धारेवर धरलं.