जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । अनेकांसारखाचं शुभमने देखील शिकत असताना अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले. परंतु, फक्त स्वप्न बघितलेच नाही तर ते पूर्ण करण्याची धमकही ठेवली. शुभम दहावीत असतानांच त्याच्या वडिलांचे निधन झाले. घरची परिस्थिती गरिबीची होती. आईने दुसऱ्याच्या शेतावर काम करून शुभमला शिकवले. या सगळ्या परिस्थितीची जाण ठेवत शुभमने अखेर अधिकारी पदाची मजल गाठलीच. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शुभमने या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला न्याय दिला आणि तो अखेर पीएसआय झाला.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील शुभम साहेबराव शिंदे रहिवासी. शुभम, त्याची आई आणि मोठी बहीण असा शुभमचा परिवार आहे. शुभमचे वडील वायरमन होते. तो दहावीत असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं.कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता. असे असतांना संपूर्ण कुटुंबाची धुरा शुभमची आई म्हणजेच सरला शिंदे यांनी सांभाळली. स्वतःच्या घरची सहा एकर शेती सांभाळली. मुलांच्या शिक्षणात कमी पडू नये यासाठी त्या दुसऱ्यांच्या शेतातही कामाला जाऊ लागल्या. हे सर्व करत सरला शिंदे यांनी दोन्ही मुलांचं शिक्षण पूर्ण केल.
दरम्यान, पदवीला शिकत असताना एका खाजगी क्लासच्या कार्यक्रमात अधिकारी झालेली मुलं आणि त्यांच्या आईवडिलांचा सत्कार होताना शुभमने बघितले.तेव्हा शुभमने अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं. त्याच्या स्वप्नाच्या दिशेने त्याने जद्दीने वाटचाल केली. मित्रांच्या माध्यमातून शुभमने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची माहिती घेतली. त्याचसोबत त्याने youtube आणि social media च्या माध्यमातून परीक्षेच्या तयारीबाबत माहिती मिळवली. अधिकारी झालेल्या अनेक जणांच्या मुलाखती बघितल्या. त्यातून त्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांची यादी मिळाली. पुस्तकांची लिस्ट तयार करून शुभमने अभ्यासाला सुरुवात केली. क्लास लावण्याची परिस्थिती नसल्यामुळे शुभमने घरीच अभ्यास केला.
सप्टेंबर २०२१ मध्ये त्याने आयोगाची पहिली पूर्व परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळाले. त्यानंतर जळगाव मध्ये अभ्यासिका लावून त्याने मुख्य परीक्षेसाठी तयारी सुरु केली. २०२२ मध्ये झालेली मुख्य परीक्षा शुभम उत्तीर्ण झाला आणि अधिकारी होण्याचा त्याचा ध्यास पूर्ण केला आणि वयाच्या २५ व्या वर्षी शुभम हा पीएसआय झाला.
शुभमच्या या यशाचा गावकर्यांना मोठा अभिमान आहे. या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी संपूर्ण गावात मिरवणूक काढली. संपूर्ण गावाने शुभमच्या यशाचा सोहळा साजरा केला.