जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गणेश कॉलनी परिसरातील प्रोफेसर कॉलनीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड झाला आहे. पुणे येथील सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी शहरातील प्रोफेसर कॉलनीत छापा टाकला. या ठिकाणी एक २५ वर्षीय बांगलादेशी तरुणीला देहविक्री व्यवसायासाठी आणल्याचे आढळून आले. या घराची मालकीण महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे येथील फ्रीडम फर्म या संस्थेच्या सदस्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन एका बांगलादेशी महिलेला जळगावात आणून घरात डांबून तिच्याकडून देहविक्री करवून घेत असल्याची तक्रार केली. त्यावर डॉ. रेड्डी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचारी व पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक जिल्हा उद्योग केंद्राच्या मागील प्रोफेसर कॉलनीत छापा टाकण्यासाठी पाठवले.

पोलिस पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता त्यांना पूजा आत्माराम जाधव या महिलेने तिच्या घरात एका २५ वर्षीय बांगलादेशी तरुणीला एका खोलीत कोंडून ठेवल्याचे आढळून आले. तिच्याकडे बांगलादेशातील ओळखपत्र देखील आढळून आले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात दोन्ही महिलांविरुद्ध पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष घर मालकिणीवर आधीच दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वीही जळगावातील एमआयडीसी भागातील एका हॉटेलमध्ये अशाच स्वरूपाच्या प्रकरणात दुसरी बांगलादेशी तरुणी आढळून आली होती. त्यामुळे जळगावमधील वाढत्या देहविक्री व्यवहारांबाबत चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांकडून आता या तरुणीला भारतात कसे आणले गेले, तिच्या ओळखीचे दस्तऐवज कोणत्या मार्गाने तयार झाले आणि तिला या अमानुष व्यवसायात ढकलणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा महिला तस्करी आणि देहविक्रीच्या प्रकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.










