रुग्णांना मोठा दिलासा: डायबिटीज, बीपी, हार्टअटॅकसह ३० औषधे होणार स्वस्त; केंद्राकडून किमती निश्चित

जून 1, 2026 3:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडत असतानाच, केंद्र सरकारने देशातील लाखो रुग्णांना एक मोठा आणि दिलासादायक दिलासा दिला आहे. तो म्हणजे राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) डायबिटीज (मधुमेह), बीपी (रक्तदाब), हार्टअटॅक (हृदयविकार) यांसारख्या गंभीर आजारांवरील ३० आवश्यक औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आता ही औषधे रुग्णांना अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होणार असून, औषध कंपन्यांच्या मनमानी कारभाराला आणि किमतींना लगाम बसणार आहे.

medicine

देशात सध्या एकाच साठ्या (सॉल्ट) असलेल्या औषधाचे बाजारात विविध ब्रँड्स उपलब्ध आहेत आणि त्यांच्या किमतींमध्ये मोठी तफावत पाहायला मिळते. यामुळे वेगवेगळ्या मेडिकल स्टोअर्समध्ये रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. ही लूट थांबवण्यासाठी आता एनपीपीएने (NPPA) ३० औषधांच्या किमतींवर कमाल मर्यादा निश्चित केली आहे.

त्यामुळे औषध उत्पादक कंपन्या आणि विक्रेते आता ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा एक रुपयाही अधिक आकारू शकणार नाहीत. या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

कोणत्या औषधासाठी किती पैसे मोजावे लागणार?

सरकारने मधुमेहावरील औषधे एम्पाग्लिफ्लोझिन, सिटाग्लिप्टिन आणि मेटफॉर्मिन यांची किंमत प्रति टॅब्लेट ₹१४.८८ निश्चित केली आहे.
मधुमेहासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लिमेपिराइड आणि नेटफॉर्मिन टॅब्लेटची किंमत ₹११.९१ निश्चित करण्यात आली आहे.
रक्तदाब आणि हृदयरोगासाठी वापरल्या जाणाऱ्या बिसोप्रोलोल फ्युमरेट आणि अम्लोडिपिन यांची किंमत प्रति टॅब्लेट ₹९.४० निश्चित करण्यात आली आहे.
अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या टारकोलिमीन प्रोलॉन्गड-रिलीज कॅप्सूलची किंमत प्रति टॅब्लेट ₹१२७ निश्चित करण्यात आली आहे.
व्हिटॅमिन डी३ ओरल सोल्युशनच्या १ मिलीची किंमत प्रति मिली ₹१४.९१ निश्चित करण्यात आली आहे.
मिथाइलकोबालामिन, एल-मिथाइलफोलेट कॅल्शियम आणि कॅल्शियमसाठी वापरल्या जाणाऱ्या पायरीडॉक्सल-५ फॉस्फेट गोळ्यांची किंमत प्रति गोळी ₹१९.७८ निश्चित करण्यात आली आहे.
वेदनाशामक जेलची किंमत प्रति ग्रॅम ₹३.३१ निश्चित करण्यात आली आहे.
निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दर आकारणे खपवून घेतले जाणार नाही.

नवीन दर कधीपासून लागू होणार?

एनपीपीएने स्पष्ट केले आहे की, सध्या बाजारपेठेत आणि मेडिकल स्टोअर्समध्ये असलेला औषधांचा जुना साठा (स्टॉक) संपल्यानंतर, नवीन उत्पादित होणाऱ्या औषधांच्या बॅचवर हे नवीन आणि कमी केलेले दर लागू केले जातील. यामुळे गंभीर आजारांवर दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या लाखो कुटुंबांचा मासिक औषधखर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now