दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीतून दिलासा नाहीच; जळगावात प्रति किलोचा भाव किती?
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२४ । एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु असताना यातच खाद्य तेलाच्या किमती पुन्हा गगनाला भिडल्या आहेत. यामागील कारण म्हणजे गेल्या महिन्यात केंद्र सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कच्च्या सोयाबीन, पाम तेल, आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २०% वाढ केली. याचबरोबर, रिफाइंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्क १३.७५% वरून ३५. ७५% पर्यंत वाढवण्यात आले आहेत.
एकीकडे सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल, पण दुसरीकडे सामान्य ग्राहकांना तेलाच्या दरवाढीचा आर्थिक भार सहन करावा लागतोय. यामुळे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये प्रति किलो २५ ते ३० रुपयांनी वाढ झाली आहे.
दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेल दरवाडीचा भडका उडतो, हे काही नवीन नाही, मात्र, लिटरमागे तब्बल २५ ते ३० रुपये दरवाढीने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. याचा महिन्याच्या बजेटवरदेखील परिणाम झाला आहे.
जळगावात प्रति किलो तेलाचा दर काय?
दीड महिन्यापूर्वी सध्या घाऊक बाजारपेठेत १५ किलो सोयाबीन तेलाच्या डब्या १६०० रुपयापर्यंत मिळत होता. मात्र आता तो वाढून १९०० ते २००० रुपयापर्यंत विकला जात आले. तर होलसेलमध्ये सोयाबीन तेलाचे ९००MLचे पाऊच १२८ ते १३२ रुपये इतके आहे. तर खुले एक किलो सोयाबीन तेलाचा दर जवळपास १३५ ते १४० रुपये पर्यंत आहे. यापूर्वी गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीन तेलाचा एक किलोचा दर ११० रुपयांपर्यंत होता. दुसरीकडे शेंगदाणा १८० ते १८५, सूर्यफूल १४० ते १५०, पामतेल १२० ते १२५ रुपये असे भाव आहेत. यात सोयाबीनच्या तेलाला सर्वाधिक मागणी आहे, अशी माहिती किराणा व्यापारी बाळूशेट चोपडा यांनी दिली.