हतनूर धरणातून तापी नदीत विसर्ग होण्याची शक्यता; नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा!

जून 28, 2026 6:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात पाण्याची आवक सतत वाढत असल्याने, पुढील काही तासांत हतनूर धरणातून तापी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

hatnur dam jpg webp

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

तापी आणि पूर्णा नदीच्या दोन्ही तीरांवर राहणाऱ्या नागरिकांनी, तसेच शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

नदीपात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढू शकत असल्याने नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे आणि आपल्या जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, यंदा जून महिन्याचा पंधरवडा उलटल्यानंतरही पाऊस न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढू लागली असून, पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.

हतनूर धरणावर दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचा पाणीपुरवठा, भुसावळ नगरपालिका, यावल तालुक्यातील अनेक गावे तसेच परिसरातील सिंचन व्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणि पाणलोट क्षेत्रातील पावसावर हजारो नागरिक व शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. सध्या हतनूर धरणात २११ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ४६.०८ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now