जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२६ । राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असून, हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा आणि राज्यभरात पुढील ६ दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः आज, रविवारी (२८ जून) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे आजपासून ४ जुलै या कालावधीत जळगाव जिल्ह्यात मान्सूनची सक्रियता वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, रविवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून पुणे, रायगड, रत्नागिरी आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२४ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या २४ जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे.
जळगावात ४ जुलैपर्यंत मान्सूनची सक्रियता
२८ जून ते ४ जुलै या कालावधीत जळगाव जिल्ह्यात मान्सूनची सक्रियता वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या काळात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून अतिवृष्टीचा अंदाज नाही. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, पुढील आठवडाभर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच हवेतील आर्द्रता ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याने नागरिकांना उकाडा आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागू शकतो.






