जळगाव लाईव्ह न्यूज| २६ ऑगस्ट २०२३| राज्यात पावसाअभावी पिकांची स्थिती गंभीर झाली आहे. पावसाचा खंड ३१ दिवसांपेक्षा जास्त असलेल्या महसूल मंडळांची संख्या आता ३०० वर पोहोचली असून १५ ते २१ दिवस खंड असलेल्या एकूण महसूल मंडळांची संख्या पाचशेच्या घरात गेली आहे. यावरून उत्पन्नात घट होण्याची शक्यता असून आगामी दुष्काळाची चाहूल लागली आहे.
त्यातच येत्या पंधरवाड्यात सुद्धा समाधानकारक पाऊस नसल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. उत्पादनात किमान ६०% पर्यंत घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे कपाशी व सोयाबीनवर कीड रोगांचाही प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात पडला आहे.
राज्यातील दुष्काळ भागांसाठी आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत उपाययोजना आणि त्यासाठी लागणारी आर्थिक मदत शासनाने करावी, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना भेटून आज राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केली.
खरीपाची पिके धोक्यात आली आहेत. काही ठिकाणी करपली आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी काय केले जाणार? धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे. त्याचा आढावा घेऊन उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी वापरण्याचे नियोजन करणार का? पुढील काही दिवस पाऊस ओढ देणार आहे. आता परतीच्या पावसावरच मदार दिसते आहे, दरम्यानच्या काळात कृत्रिम पावसाबाबत निर्णय घेणार का? अशा कित्येक प्रश्नांना सरकारला तोंड द्यावे लागणार आहे.