जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यासह जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी काल २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. याच दरम्यान भुसावळमध्ये ड्युटीवर असलेल्या पोलीस अंमलदार मुरलीधर धनगर यांनी वृद्ध मातेला व्हीलचेअर बसवून मतदान केंद्रापर्यंत नेऊन माणुसकीचे दर्शन घडवले. पोलिसाच्या मदतीमुळे वृद्ध मातेला मतदानाचा हक्क बजावता आला.

याबाबत असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) कर्तव्यदक्ष अंमलदार मुरलीधर धनगर यांची भुसावळ येथील मतदान केंद्रावर ड्युटी होती. येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी झाली होती. याच दरम्यान मुरलीधर धनगर यांचे लक्ष एका वृद्ध, चालण्यास असमर्थ असलेल्या आजींकडे गेले. आपली ड्युटी बजावत असतानाच क्षणाचाही विलंब न लावता, धनगर यांनी मातेसमान असलेल्या या वृद्ध महिलेला व्हीलचेअरवर बसवले.

केवळ बसवून ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतः व्हीलचेअर ढकलत आजींना मतदान कक्षापर्यंत सुखरूप नेले. या मदतीमुळे त्या वृद्ध मातेला आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावता आला. कडक उन्हात आणि बंदोबस्ताचा ताण असतानाही, एका पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खाकी वर्दीतील या माणुसकीमुळे पोलीस प्रशासनाबद्दलचा आदर आणि विश्वास अधिक दृढ झाला आहे, अशा प्रतिक्रिया तेथील उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या.












