⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

टक्केवारीवर अडले जळगावकरांच्या विकासाचे घोडे!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरवासियांच्या नगरसेवक, स्थानिक प्रतिनिधींकडून प्रचंड अपेक्षा आहेत. आजवर सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी आणि सत्तांतरनंतर आलेले लोकप्रतिनिधी दोघांचे पक्ष वेगवेगळे असले तरी चेहरे तेच आहेत. जळगाव शहर मनपाच्या आजवरच्या राजकारणात मोजकेच चेहरे बदलले असून दिग्गज सत्ताधारी जुनेच आहे. जळगाव (jalgaon) शहराचा विकास आजवर रखडेललाच असून विकासाचे घोडे टक्केवारीवर अडले आहे. वॉटरग्रेसचा गलथान कारभार असो कि घनकचरा प्रकल्प असो योग्य नियोजनाचा अभाव आणि केवळ स्वार्थासाठी विरोध, दुर्लक्ष यामुळेच विकास दूर आहे.

जळगाव शहराच्या राजकारणात गेली अनेक वर्ष माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची सत्ता होती. जळगाव शहरातील रस्ते, व्यापारी संकुले, झोपडपट्टी स्थलांतर, गावगुंडांना वचक, वाघूर धरण, पथदिवे अशा कितीतरी सोय सुविधा सुरेशदादांच्या कार्यकाळातच उपलब्ध झाल्या. आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या तुलनेत कमी का असेना पण शहरात विकास होत होता. गेल्या दोन पंचवार्षिकपासून सुरेशदादा जैन हे घरकूल घोटाळ्यामुळे बाहेर असल्याने मनपात फारसे लक्ष देऊ शकले नाही. ते सक्रिय असताना सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांच्यावर त्यांचा एकहाती अंमल होता, परंतु गेल्या काही वर्षात ते नियोजन कोलमडले.

अटलांटा कंपनीने शहरातील रस्ते तयार केल्यानंतर पुन्हा शहरातील रस्तेच तयार झाले नाही. पथदिवे वारंवार तेच तेच बदलण्यात येत होते. हातपंप तर मनुष्यबळ आणि साहित्याअभावी कालबाह्य झाले. गटारी ओबडधोबड तयार करण्यात आल्या, उद्याने अविकसित राहिली, अतिक्रमण वाढले, मेहरूण तलावाचा विकास रखडला, कचऱ्याचे साम्राज्य वाढले, मनपाच्या (jalgaon municipal corporation) उत्पन्नाचे स्रोत मर्यादित राहिले, अशा कितीतरी बाबी गेल्या दहा वर्षात समोर आल्या. एकीकडे आजूबाजूच्या जिल्ह्यात चौफेर विकास होत असताना जळगाव शहर मात्र खड्ड्यातच राहिले. नागरिक सहनशील असल्याने निमूटपणे सर्व सहन करीत करभरणा करीत आहेत. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि नगरसेवकांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी शहर मागासलेले राहिले.

जळगाव शहरातील कचरा संकलन करण्यासाठी वर्षभरापूर्वी वॉटरग्रेस कंपनीला मक्ता देण्यात आला. सुरुवातीला वॉटरग्रेसला असलेला विरोध काही बैठकीनंतर आपोआप मावळला. वॉटरग्रेसकडून योग्य पद्धतीने काम होत नाही, कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी माती, दगड मिश्रण केले जातात अशी ओरड नेहमीच होत असते. वॉटरग्रेसकडून नगरसेवकांना दरमहा १५ हजार रुपये मिळतात अशी चर्चा देखील मध्यंतरी झाली होता. बीएचआर प्रकरणाच्या चौकशीत देखील वॉटरग्रेस संदर्भातील काही कागदपत्रे समोर आली होती. वॉटरग्रेसचे काम समाधानकारक नसताना देखील नगरसेवक ते चालवून घेत आहेत. शहरात एलईडी लाईट बसविण्याचे मोठे काम हाती घेण्यात आले होते, ते देखील अर्धवट राहिले. कुठे पथदिवे लागले तर कुठे लागलेच नाही. वेळेचे नियोजन देखील बऱ्याचवेळा चुकते. दिवसाढवळ्या पथदिवे सुरु असतात. कुठेच कुणाचे नियोजन नसल्याने सर्वत्र अनास्था आहे.

शहरातील रस्त्यांच्या कामाचे अद्याप योग्य नियोजन लागलेले नसून काही प्रमाणात कामाला सुरुवात झाली आहे. घनकचरा प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची वेळ येऊन ठेपली असतांनाच काही नगरसेवकांनी विरोध सुरु केला आहे. बहुतांश नगरसेवक हे भाजप बंडखोर आहेत. एकीकडे आम्ही जळगावच्या नागरिकांसाठी आहोत अशी भूमिका घेत दुसरीकडे विरोध दर्शवायचा असा कार्यक्रम सुरु आहे. शहरवासियांच्या विकासाचे कुणालाही काहीही देणघेणे नाही. काही दिवसांपूर्वी तर नगररचना विभागातील कारभारावरून नगरसेवक, उपमहापौर यांची महासभेतच जुंपली. पुढे पुन्हा सर्व प्रकरण थंडबस्त्यात गेले. जळगावकरांच्या प्रश्नांवर, समस्येवर बोलायला कुणालाही वेळ नाही. टक्केवारीच्या अटीवरच जळगावच्या विकासाचे घोडे अडले आहे.

हे देखील वाचा :