⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

चाळीसगावसह तालुक्यात साथीच्या आजारांनी काढले डोके वर

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव शहरासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे व त्यामुळे निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे शहरासह तालुक्यात मलेरिया, डेंग्यूच्या यासारख्या साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ शहरात तसेच तालुक्यातील काही गावांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे आणि वातावरणातील बदलामुळे होत असल्याचे बोलले जात आहे.

चाळीसगाव शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे व निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे डासांचे प्रमाण खूप वाढले असून लहान बालके मोठ्या प्रमाणावर आजारी पडत असल्याने तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. चाळीसगाव शहरातील सर्व खासगी रुग्णालय साथीच्या आजारांनीग्रस्त रुग्णानी भरले आहेत. थंडी, ताप, खोकला, अंगदुखी आदी साथीच्या आजारांनी नागरिक बेजार झाले आहेत. तालुक्यात अद्याप डेंग्यूचा रुग्ण आढळून आला नसला तरी वातावरण पाहता ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी शहरात जागोजागी साचलेली घाण, कचरा याची त्वरित विल्हेवाट लावावी व भविष्यात होणाऱ्या आजाराला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.