⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यात सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे भव्य आयोजन

जळगाव जिल्ह्यात सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचे भव्य आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | १० फेब्रुवारी २०२४ | जळगाव येथे गेल्या २४ वर्षासासून सार्वजनिक शिवजयंतीचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील सालाबादाप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्षपदी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती उपाध्यक्षपदी एजाज मलिक, नंदू अडवाणी आणि रजनीकांत कोठारी यांची तर कार्याध्यक्षपदी माजी महापौर जयश्री महाजन, सचिवपदी राम पवार, खजिनदारपदी खुशाल चव्हाण असणार आहेत. सुकाणू समितीत प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, डॉ.राधेश्याम चौधरी, मुरलीधर महाजन, दिलीप तिवारी, चंदन कोल्हे, रविंद्र भावसार, कल्पेश सोनवणे, संग्रामसिंह राजपुत, अश्विनी देशमुख आदी असणार आहेत. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, ना.गिरीष महाजन, ना.अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर व जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन हे समितीचे मार्गदर्शक आहेत.

सर्व जाती, धर्म, समूह, विविध विचार प्रवाह या सगळ्यांना सोबत घेवून जयंती साजरी करणे हे सार्वजनिक शिवजयंतीचे वैशिष्ट्य आहे. महोत्सवाची सुरुवात दि.११ रोजी पिंप्राळा येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवप्रतिज्ञा घेवून सुरुवात होणार आहे.

दि.१५ रोजी किल्ले बनवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत आकर्षक बक्षिसे व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. किल्ले बनविण्यासाठी लागणारे साहित्य समितीतर्फे पुरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख पुरुषोत्तम चौधरी असणार आहे. या बनविलेल्या किल्ल्यांचे प्रदर्शन व यासोबतच महेश पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेले आरमार प्रदर्शन दि.१६, १७ व १८ फेब्रुवारी असे तीन दिवस हे प्रदर्शन भाऊंचे उद्यानासमोर, काव्य रत्नावली चौकाजवळ सगळ्यांना बघण्यासाठी खुले असणार आहे.

दि.१७ रोजी पिंप्राळा येथे किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१८ रोजी शालेय स्तरावरील मुलांसाठी चित्र रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. जैन उद्योग समुह व कला अध्यापक संघाचे सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे. या स्पर्धेत देखिल मुलांना सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत.

दि.१९ रोजी भव्य शोभायात्रा निघणार आहे. सकाळी आठ वाजता ही भव्य शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून निघणार आहे. उत्सव समितीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व छत्रपती संभाजी राजे जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दि.६ जून रोजी राज्यभिषेक दिनाच्या दिवशी या महोत्सवाची सांगता होणार आहे. छत्रपती शिवरायांची जयंती ते राज्यभिषेक दिन असं या महोत्सवाचे स्वरुप असणार आहे. या महोत्सवात सर्व जातीधर्माच्या लोकांनी व विविध शैक्षणिक संस्थांनी यात सामील व्हावं असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.