जळगाव शहर

जळगावकरांसाठी एक लाख पुस्तकांची अनोखी मेजवानी! मोफत पुस्तकांसाठी पहाटेपासूनच वाचकांची गर्दी

जळगाव लाईव्ह न्यूज । फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामच्या डिजिटल विश्वात तरुणाईचा वाचनाकडे ओढा कमी होत असल्याची चर्चा नेहमीच होते. मात्र, जळगावमध्ये राबविण्यात आलेल्या एका अनोख्या उपक्रमाने या चर्चेला सकारात्मक उत्तर दिले आहे. शहरातील काव्यरत्नावली चौकात तब्बल एक लाख पुस्तके वाचकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली. या पुस्तकांचा लाभ घेण्यासाठी पहाटेपासूनच पुस्तकप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय आणि डोंबिवली येथील पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासूनच पुस्तकप्रेमींनी काव्यरत्नावली चौकात गर्दी करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, पुस्तक मिळविण्यासाठी नागरिकांची तब्बल शंभर मीटरपर्यंत रांग लागली होती.

या उपक्रमात प्रत्येक व्यक्तीला एक पुस्तक विनामूल्य देण्यात आले. लहान मुलांपासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत, तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटांतील वाचकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आपल्या आवडीचे पुस्तक निवडण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसत होते.

डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे पुस्तक वाचनाची सवय कमी होत असल्याचे चित्र असताना, या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद विशेष लक्षवेधी ठरला. वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानाचा प्रसार करणे आणि नव्या पिढीला पुस्तकांकडे आकर्षित करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

मोफत पुस्तकांच्या या अनोख्या मेजवानीला जळगावकरांनी दिलेला भरभरून प्रतिसाद पाहता, डिजिटल युगातही पुस्तकांची ओढ आणि वाचनसंस्कृती टिकून असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button