
जळगाव लाईव्ह न्यूज । सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध धावून जात, मारहाण झालेल्या एका रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व ‘न्याय विश्वास फाउंडेशन’चे संस्थापक ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. ॲड. निकम यांनी स्वतः जळगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन रिक्षाचालकाची बाजू मांडल्यामुळे संबंधित पीडित कष्टकऱ्याला मोठा धीर मिळाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरातील गजानान माळी नावाच्या एका रिक्षाचालकाला एका कार चालकाकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. संबंधिक कार चालकाने बंदूक दाखवून धमकवल्याचा आरोपही संबंधित रिक्षा चालकाने केला आहे. मात्र कार चालक मोठा शासकीय अधिकारी असल्याने तक्रार देवूनही पोलीस दखल घेत नव्हते, यामुळे हताश झालेल्या रिक्षाचालकाने न्याय मिळवण्यासाठी ॲड. अनिकेत निकम यांच्याकडे मदतीची हाक दिली. सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या ॲड. निकम यांनी या रिक्षाचालकाची व्यथा समजून घेतली.
यानंतर ॲड. अनिकेत निकम यांनी पीडित रिक्षाचालकाला सोबत घेत थेट जळगाव शहर पोलीस स्टेशन गाठले. तेथे त्यांनी उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि रिक्षाचालकावर झालेल्या अन्यायाबाबत न्याय देण्याची मागणी केली.
ॲड. निकम यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीची दखल घेत, पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषी आरोपीविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिले आहे. ॲड. अनिकेत निकम यांनी दिलेल्या मानसिक आधारामुळे आणि स्वतः पोलीस ठाण्यात उपस्थित राहून बाजू मांडल्यामुळे या कष्टकरी रिक्षाचालकाला अन्यायाविरुद्ध लढण्याची मोठी ताकद मिळाली असून, ॲड. अनिकेत निकम यांच्या या सामाजिक बांधीलकीचे कौतुक होत आहे.





