जळगाव लाईव्ह न्यूज । फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अकलूद गावाच्या शिवारात तापी नदीकाठी असलेल्या एका दुमजली घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका केली. या कारवाईत कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालय, यावल पोलीस स्टेशन आणि निंभोरा पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी कारवाईपूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने पंटर पाठवून कुंटणखान्याची माहिती मिळवली. त्यानंतर पथकाने अकलूद शिवारातील संबंधित दुमजली घरावर छापा टाकला. घरामध्ये आश्चर्यकारकपणे वेश्याव्यवसायासाठी अनेक खोल्या तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
छाप्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार महिलांची सुटका करण्यात आली. त्यापैकी तीन महिला मूळच्या कलकत्ता, पश्चिम बंगाल येथील असून सध्या भुसावळ येथे वास्तव्यास आहेत, तर एक महिला स्थानिक भुसावळ येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.











