⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

मारुळ येथे ‘एक गाव, एक दिवस’ अभियान कार्यक्रम संपन्न

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील मारुळ येथे अंधाराकडून प्रकाशाकडे या उक्तीप्रमाणे गोरगरीब जनतेच्या घरांमधील अंधार दूर व्हावा गरिबांचे जीवन प्रकाशमय होऊन त्यांचा आर्थिक विकास स्तर उंचवावा, या अनुषंगाने राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांसाठी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ महावितरणमार्फत यशस्वीपणे राबविली. योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील ३१२ कुटुंबांना नवीन घरगुती वीज कनेक्शन देण्यात आले. सावदा व फैजपूर उपविभागातील अधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ ही गोरगरीब जनतेसाठी प्रभावशाली ठरल्याचे आहे, असे प्रतिपादन मारुळचे सरपंच असद अहमद जावेद अली सय्यद यांनी केले.

मारुळ येथे ‘एक गाव एक दिवस अभियान’ कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच असद सय्यद हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील नरेश मासोळे, फैजपूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर.टी.फिरके, सहाय्यक अभियंता एच.एन.पाटील, धनंजय चौधरी, हैदर अली सय्यद आदी उपस्थित होते. कार्यक्रमात संजय तायडे या नवीन विज ग्राहाकाला मान्यवरांच्या हस्ते घरगुती विज मिटरचे वाटप करण्यात आले.

शेतकरी कृषी योजनेला प्रतिसाद
सद्यस्थितीला निसर्गाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संजीवनी देणारी महाराष्ट्र शासनाची ‘शेतकरी कृषी योजना’ ही वरदान ठरत असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती वीज पंपावरील विज बिलामध्ये सप्टेंबर २०२० पासून ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या शेती पंपावरील एकूण बिलांमध्ये ५० टक्के सूट देण्यात येत आहे. योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गाकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फैजपूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता आर.टी.फिरके यांनी सांगितले.

बारा तक्रारींचा जागेवरच निपटारा

गावातील नागरिकांनी नवीन घरगुती वीज कनेक्शन मागणी केल्यानुसार गावात प्रत्यक्षात फिरून पाहणी करून आवश्यकतेनुसार ठिक ठिकाणी नवीन १८ विद्युत पोल उभे करून व नवीन घरगुती वीज कनेक्शन देण्यात आले व एक नवीन ट्रांसफार्मर बसविण्यात आला असून बुद्धनगर भागामध्ये नवीन अठरा विद्युत पोल वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी कामे प्रस्तावित आहे. गावातील नागरिकांच्या किरकोळ स्वरूपाच्या बारा तक्रारींचा जागेवरच निपटारा केल्याचे न्हावी झोनचे सहाय्यक अभियंता धनंजय चौधरी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास बिलिंग विभागाचे के.बी.सोनवणे, ग्रा.पं.सदस्य मुर्तजा अली सय्यद, उर रहमान पिरजादे, मुखतार उद्दिन फारुकी, सिताराम पाटील, हिरामण पाटील, सुरेश पाटील, युवराज इंगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू तायडे, पत्रकार अली सय्यद, विद्युत सहाय्यक भूषण मेढे, श्री.तायडे, श्री.कापडे, कासिफ सय्यद, जकीउद्दीन फारुकी यांसह विद्युत कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हैदर जनाब यांनी केले. सूत्रसंचालन व आभार बाळू तायडे यांनी केले.