चोरट्यांची मजल वाढली, चक्क ट्रान्सफार्मरमधून साडेआठ लाखांच्या कॉईलसह ऑईल चोरले

Muktainagar News । जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑक्टोबर २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा-वढोदा उपसा सिंचन योजनेच्या प्रोजेक्ट जवळील ट्रान्सफार्मरमधून चोरट्यांनी एक लाख 65 हजार रुपये किंमतीची तांब्याची कॉईल तसेच सात लाख रुपये किंमतीचे साडेचार हजार लिटर ऑईल लांबवल्याची धक्कादायक 23 ते 28 ऑक्टोंबरदरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्यांची संधी साधत चोरटे चांगलेच सक्रिय झाले आहे. अनेक ठिकाणी घरफोडी आणि दुकानफोडी होत असून चोरटे बिनधास्तपणे फिरत आहेत. दुचाकी, चारचाकी, घरफोडी, दुकानफोडीनंतर चोरट्यांनी आता चक्क ट्रान्सफार्मर लक्ष केले आहे. विद्युत पुरवठा खंडित करून ट्रान्सफार्मरमधील ऑईल आणि कॉईल चोरी केल्याचा प्रकार घडत आहे. चोरट्यांमुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे नुकसान होत आहे.

खाजगी कर्मचारी राजेंद्र गंभीर पाटील (56, निंबोल, ह.मु.मोहन नगर, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, कुर्‍हा-वढोदा उपसा सिंचन योजनेच्या प्रोजेक्ट जवळील ट्रान्सफार्मरचा वीजपुरवठा भामट्यांनी खंडित करीत वीज वायरी कापल्या व ट्रान्सफार्मरमधील एक लाख 65 हजार रुपये किंमतीची तांब्याची कॉईल तसेच सात लाख रुपये किंमतीचे साडेचार हजार लिटर ऑईल लांबवले. हा प्रकार २३ ते २८ ऑक्टोंबरदरम्यान घडला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार श्रावण गोंडू जवरे करीत आहेत.