वाहनधारकांनो लक्ष द्या ! शिवमहापुराण कथेनिमित्त फैजपुरात अवजड वाहनांना ‘नो एंट्री’, पर्यायी मार्ग जाणून घ्या..

मार्च 9, 2026 5:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील पाडळसे येथील अकलूद शिवारात उद्या म्हणजेच १० मार्चपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला सुरवात होणार आहे. कथेच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढली. या बदलामुळे फैजपूर परिसरात अवजड वाहनांना बंदी राहणार असून, बसेससह लहान वाहनेही अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे.

shivpurankatha

भुसावळ शहरानजीक असलेल्या भुसावळ-फैजपूर रोडवरील अकलूद शिवारात पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा ही १० ते १६ मार्च दरम्यान होणार आहे. या कालावधीत दररोज सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळाजवळील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कथेसाठी देशभरातून तब्बल सात ते दहा लाख भाविक येतील, असा अंदाज आयोजन समितीने वर्तवला आहे.

असा राहणार बदल?

– भुसावळ ते फैजपूर मार्गावरील हॉटेल रिव्हर पॉइंट ते भोरटेक फाटापर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद
– भुसावळकडून फैजपूरकडे जाणाऱ्या बसेस, कार, रिक्षा, दुचाकी अकलूद जुना टोल नाक्यापासून यावलमार्गे वळवून फैजपूरकडे जातील. तसेच तिकडून येणारी ही वाहने याच मार्गे भुसावळ येथील तापी नदीपुलावरून येतील.
– रावेर, सावदा, फैजपूरमार्गे भुसावळकडे येणाऱ्या बस, कार, रिक्षा, दुचाकी सावदा येथून वळवून हतनूर-बोहर्डी फाटामार्गे भुसावळकडे उकडे येतील.
– रावेर, सावदा, फैजपूरमार्गे येणारी अवजड वाहने यावल, किनगावमार्गे जळगाव व भुसावळकडे येतील.
– चोपडा, यावलकडून भुसावळकडे जाणारी वाहने धानोरा फाटा येथून वळवून डांभूर्णीमार्गे जळगावकडून भुसावळकडे जातील.
– भुसावळकडून फैजपूरकडे जाणारे अवजड वाहने जळगाव, डांभुर्णी, किनगाव, यावलमार्गे फैजपूरकडे जातील.

तसेच तापी नदी पुलाजवळील वाय पॉइंटजवळ बसस्थानक (जंक्शनवर) तात्पुरतेकार्यान्वित करण्यात येणार आहे. तात्पुरत्या बसस्थानकापासून ५०० मीटर अंतरावर कथास्थळ असल्याने सोय होणार आहे. कथा संपल्यानंतर रोज तापी पुल ते गांधी पुतळा हा मार्ग २ तासांसाठी झिरो ट्रॅफिक झोन असेल. अर्थात दोन तास या मार्गावरील सर्व वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

बायपासवर वाढणार वर्दळ
वाहतूक मार्गात बदलानंतर रावेरहून येणारी अवजड वाहने, चोपडा-यावलकडून भुसावळकडे जाणारी वाहने तसेच भुसावळहून फैजपूरकडे जाणारी अवजड वाहने जळगावातून किनगावमार्गे फैजपूरकडे जाणार असल्याने जळगाव परिसरात वाहतुकीची वर्दळ वाढणार आहे. बायपास सुरू झाल्याने ही वाहतूक तिकडून जाऊ शकते, त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ताण कमी होण्यास मदत होईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now