जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सभापती सुनील महाजन यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत, 18 पैकी तब्बल 13 संचालकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे महाजन यांची सभापतीपदाची खुर्ची आता धोक्यात आली आहे.

नेमका आरोप काय?
अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या संचालकांचा असा आरोप आहे की, सभापती सुनील महाजन हे कारभार करताना इतर संचालकांना विश्वासात घेत नाहीत. बाजार समितीचा कारभार लोकशाही पद्धतीने चालवण्याऐवजी ते ‘मनमानी’ करत असून, महत्त्वाचे निर्णय घेताना संचालक मंडळाला डावलले जात असल्याचे गाऱ्हाणे या १२ संचालकांनी मांडले आहे.

सोमवारी (दि २७) या १२ संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अविश्वास प्रस्तावाचे पत्र अधिकृतपणे सुपूर्द केले. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यास, नियमानुसार विशेष सभा बोलावली जाईल. या सभेत गुप्त मतदानाद्वारे सभापतींचे भवितव्य ठरेल. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत (१२ सदस्य) सध्या विरोधकांकडे असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, ऑगस्ट २०२५ मध्ये तत्कालीन सभापती शामकांत सोनवणे यांच्यावर अविश्वास आणून सुनील महाजन १३ मतांनी विजयी झाले होते. यानंतर आता त्याच पद्धतीने १२ संचालकांनी सभापती महाजन यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. महाजन हे या संकटातून मार्ग काढणार की बाजार समितीला नवा सभापती मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर अविश्वास प्रस्तावावर लक्ष्मण पाटील, शामकांत सोनवणे, मनोज चौधरी, योगराज सपकाळे, जयराज चव्हाण, मिलींद चौधरी, पल्लवी देशमुख, हेमलता नारखेडे, संदीप पाटील, समाधान धनगर, अरुण पाटील, लिना महाजन, यमुना सपकाळे या संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








