जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२३ । राज्यात मागील जवळपास १५ दिवसापासून पाऊस सुट्टीवर गेला होता. पावसाने विश्रांतीमुळे खरिपाच्या पिकांनी माना टाकल्या. यामुळे शेतकरी हताश झाला असून येरे येरे पावसा म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा परतला आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यापूर्वी काल शुक्रवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
या जिल्ह्यांना अलर्ट
सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आज राज्यातील पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या सुचनेनुसार, गोंदिया (Gondia) , भंडारा (Bhandara), चंद्रपूर, नागपूर (Nagpur) आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सुरूवातीला हवामान खात्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. मात्र बदलत्या हवामानानुसार ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. येत्या २५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या विविध भागात पाऊस पुर्णपणे सक्रिय होईल.. असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
खान्देशात आजपासून चार दिवस पावसाचे
खान्देशात आगामी चार दिवस पावसाची शक्यता आहे. यादरम्यान, ढगाळ वातावरण कायम राहू शकते. तसेच काही भागात किरकोळ पाऊस होऊ शकतो. आज म्हणजेच १९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पर्यंत जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो