जळगाव शहर

जळगाव शहरात आजपासून १० टक्के पाणीकपात लागू

जळगाव लाईव्ह न्यूज । यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे वाघूर धरणातील पाणीसाठा लक्षात घेता, जळगाव महानगरपालिकेने शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आज (शनिवार) पासून शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यात १५ मिनिटांची घट करण्यात आली असून, आता नागरिकांना १ तास ३० मिनिटांऐवजी १ तास १५ मिनिटेच पाणी मिळणार आहे.

शुक्रवारी पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत धरणातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात पावसाची शक्यता कमी असल्याने आणि पुढील वर्षी ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीटंचाईचे संकेत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. दिवाळीनंतर शहरात ३ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची शक्यताही प्रशासनाने वर्तवली आहे.

यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सध्या एकूण क्षमतेच्या ६९.५९ टक्के म्हणजेच १७३.१७९ दशलक्ष घनमीटर (दलघमी) जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाची शक्यता कमी असल्याने आणि उपलब्ध पाण्याचा वापर सातत्याने सुरू असल्याने पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असे संकेत मिळत आहेत.

पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मनपाकडून विशेष पथक नियुक्त केले जाणार आहे. ज्या नळांना तोट्या नाहीत, त्यांचे सर्वेक्षण करून तोट्या बसवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर करून वाहने धुणे, रस्त्यांवर पाणी मारणे अशा अनावश्यक कारणांसाठी पाणी वाया घालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होईल. पाण्याची नासाडी वाढत राहिली तर हिवाळ्यातच टंचाईचा सामना शहरातील नागरिकांना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button