जळगाव शहर

जळगावात घंटागाडी कर्मचाऱ्यांचा संप कायम; चौकाचौकांत कचऱ्याचे ढीग

जळगाव लाईव्ह न्यूज । वेतन थकल्यामुळे बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. त्यामुळे जळगाव शहरातील कचरा संकलन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, शहरात एकही घंटागाडी फिरली नाही. परिणामी, रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना कचराकोंडीचा सामना करावा लागत असल्याने महापालिका प्रशासन आणि संबंधित कंपनीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

पगार मिळेपर्यंत संप मागे घेणार नाही

बीव्हीजी कंपनीच्या घंटागाडी, कॉम्पॅक्टर, पिकअप आणि ट्रॅक्टर चालकांचे वेतन रखडल्याने बुधवारी सकाळपासून कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले. गुरुवारीही वेतनाचा प्रश्न न सुटल्याने कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला. टीबी सेंटर परिसरातील घंटागाड्यांच्या शेडमध्ये मोजकेच कामगार उपस्थित होते. जोपर्यंत थकीत पगार मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका कामगारांनी घेतली आहे.

घंटागाड्या जागेवरच उभ्या असल्याने नागरिकांना घरातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग वाढत असून, परिसरात अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे.

बीव्हीजी कंपनीचे २० कोटी रुपये थकीत

बीव्हीजी कंपनीच्या कामगारांचे वेतन आणि महापालिकेकडून कंपनीला मिळणाऱ्या थकीत बिलाचा प्रश्न या संपामागे महत्त्वाचा ठरला आहे. महापालिकेकडे कंपनीचे सुमारे २० कोटी रुपयांचे बिल थकीत असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी महापालिका प्रशासन आणि बीव्हीजी कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर गुरुवारी दुपारी महापालिकेत आयुक्त आदित्य जीवने यांच्या उपस्थितीत कंपनीच्या अधिकाऱ्यांची पुन्हा बैठक पार पडली. या बैठकीतून काय तोडगा निघतो, याकडे कामगारांसह शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

चौकाचौकांत कचऱ्याचे साम्राज्य

शहरातील अनेक भागांत कचरा साचल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिंधी कॉलनीतील कंवर नगर पोलीस चौकीसमोर कचऱ्याचा मोठा ढिगारा साचला होता. जवळच असलेल्या भाजीबाजारातील सडलेला भाजीपाला तेथे टाकण्यात आल्याने मोकाट जनावरे कचऱ्यात खाद्य शोधताना दिसत आहेत. महापालिकेलगत असलेल्या गोलाणी मार्केटच्या मागील बाजूसही फुले, भाजीपाला आणि हातगाड्यांवरील उरलेल्या अन्नाचे ढीग साचले आहेत. बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी कचरा साचल्यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सणासुदीत नागरिकांचे हाल

सणासुदीच्या काळात शहर स्वच्छ राहणे अपेक्षित असताना घंटागाड्या बंद असल्यामुळे जळगावकरांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. कचऱ्याचे ढीग वाढत राहिल्यास दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. कामगारांचे थकीत वेतन, कंपनीची थकबाकी आणि कचरा संकलन पूर्ववत करण्याचा प्रश्न यावर महापालिका प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे. संप कधी मिटणार आणि शहरातील कचरा संकलन व्यवस्था पुन्हा कधी सुरू होणार, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button