गुन्हेजळगाव शहर

जळगावात दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात; दोन मोटारसायकली हस्तगत

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील तांबापुरा आणि डी-मार्ट परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटनांचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी सोनू उर्फ साहील मोहम्मद तडवी (वय २३, रा. मच्छी बाजार, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन्ही मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास बिस्मिल्ला चौक, अजमेरी गल्ली, तांबापुरा येथील एका घरासमोरील अंगणातून हिरो होंडा सीडी डॉन (क्र. MH-19 AC 3812) ही सुमारे ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेली. त्याच रात्री रात्री १ ते २ वाजेदरम्यान डी-मार्टसमोरील रामनगर परिसरातील प्लॉट क्रमांक २८ जवळून बजाज पल्सर (क्र. MH-19 BT 5933) ही सुमारे ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेली. या दोन्ही घटनांप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.या तपासादरम्यान सोनू उर्फ साहील मोहम्मद तडवी याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून चोरीच्या दोन्ही मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.

या कारवाईत पोलिसांनी हिरो होंडा सीडी डॉन मोटारसायकल, किंमत अंदाजे ३५ हजार रुपये, तसेच बजाज पल्सर मोटारसायकल, किंमत अंदाजे ५० हजार रुपये, अशा एकूण ८५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.या गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, गिरीश दिलीप पाटील आणि मोतीलाल बोरसे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button