मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचा तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. मराठी चित्रपटाला विरोध केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर काही वेळातच एका महिलेवर विनयभंगाचा आरोप करण्यात आला. मुंब्रा येथील नवीन पुलाच्या उद्घाटनावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला अयोग्यरित्या स्पर्श केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
घटना कधी आहे
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना १३ नोव्हेंबर रोजी घडली. त्या दिवशी मुंब्रा येथील एका पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. पीडित महिला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी निघाली होती. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना स्पर्श केला. मात्र, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी महिलेसह अनेक लोक मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी निघाले होते.
महिलेच्या या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, पोलिसांनी माझ्यावर ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या अत्याचाराविरुद्ध मी लढणार आहे. आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचं ट्वीट करत जाहीर केलंय. दरम्यान, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केलं होतं.
यापूर्वी ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाला विरोध केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. स्थानिक चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना अटक केल्यानंतर जामीन मंजूर केला.