गांधीपुरा पिक संरक्षक संस्थेकडून मुक्या प्राण्यांची हेळसांड

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल येथील गांधीपुरा भागातील पिक संरक्षक संस्थेच्या वतीने चालवलेल्या कोंडवाड्यात मोकाट व पिकांच्या नुकसानीस कारणीभूत असणाऱ्या गायी-वळू व म्हशी यांना कोंडण्यात येते. त्या गुरांच्या सशुल्क मुक्ततेपर्यंत त्यांच्या चारा-पाण्याच्या व्यवस्थेची जबाबदारी संबंधित संस्थेची असतांना अत्यंत निंदनिय व भुतदया हिन असा प्रकार या ठिकाणी निदर्शनास आला असून या परीसरातील नागरीकांनी या प्रश्नी आवाज उठवला आहे.

शुक्रवारी सायंकाळी शहरातील काही तरूणांना पद्मालय रस्त्यावर अनेक गायी-गुरे व लहान वळू मोकाट फिरतांना आढळल्याने तसेच या गुरांचा गुराखी नजरेस न पडल्याने त्या गुरांना कुणाच्या हवाली करावं.? ही गुरे असतील तरी कुणाची..? असे प्रश्न पडल्याने त्यांनी अंजनी पिक संरक्षक सोसायटीस कळवले असता सोसायटी चे संचालक व तरूणांच्या मदतीने त्या गुरांना या संस्थेच्या कोंडवाड्यात कोंडण्यात आले.

शनिवारी सकाळी काही गुरांच्या मालकांनी आपली गुरे ही कोंडवाडा फी भरून नेली माञ राहीलेल्या गुरांच्या चारापाण्याची व्यवस्था या संस्थेकडून करण्यात न आल्याने शनिवारी सायंकाळी या भुकेल्या गुरांची स्थिती या परीसरातीलच स्वयंस्फूर्त तथा जबाबदार नागरीक प्रदिप मराठे यांना सतावत होती त्यामुळे त्यांनी व त्यांच्या सहकारी मिञांनी मिळेल तेथून चारा-पाणी आणून या गुरांची क्षुधा भागवली.

या संस्थेकडून या ठिकाणी कोणत्याही जनावराची चारापाण्याची तजविज केली जात नाही तसेच या ठिकाणी बंदीस्त जनावरांची कुठलीही बडदास्त ठेवली जात नाही असा आरोप प्रदिप मराठे व येथील त्यांच्या सहकारी नागरीकांनी केला असून संस्था व संस्थेचे सेक्रेटरी आपल्या बंदीत असलेली गुरे सोडण्यासाठी पशुपालकांकडून मनमानी पैसे घेतात परंतू त्या गुरांची त्यांना चारा-पाणी न देता कुठलिही बडदास्त ठेवत नसतील तसंच येथील बंदीस्त गुरांची अशीच हेळसांड जर होत असेल तर यापुढे अशी बाब खपवुन घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी प्रस्तुत प्रतीनिधींशी बोलतांना दिला.

संस्थेच्या सेक्रेटरींच्या उलट्या बोंबा
या पिक संरक्षक संस्थेचे सेक्रेटरी वसंत पांडुरंग चौधरी यांनी ती जबाबदारी आमची नसून तरी देखिल आम्ही या गुरांना चारा-पाणी करते वेळी हजर होतो असे सांगीतले.
प्रदिप मराठे यांनी केलेल्या युक्तिवादास त्यांचेकडे उत्तर च नसल्याचे यावेळी जाणवले. तसेच प्रतीनिधींनी या प्रश्नी आपल्या संस्थेचे इथल्या बंदीस्त जनावरांप्रती दायीत्व काय..? व कर्तव्य काय..? असे प्रश्न केले असता सेक्रेटरी वसंत चौधरी यांनी माञ प्रतीनिधींच्या प्रश्नास बगल देत झिडकारल्याने प्रदिप मराठे व मिञ नागरीक यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे एकंदरीत स्पष्ट होते.