⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मुस्लिमांना गरबा मंडपात प्रवेश देऊ नये, भाजप खासदाराचे धक्कादायक विधान

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । देशभरात यावर्षी नवरात्रीची (Navratri 2022) धूम जल्लोषात सुरु आहे. कोरोनाचे सावट दूर झाल्याने देशभरात नवरात्रीचा मोठा उत्साह आहे. संपूर्ण देशात मंडपांमध्ये देवीची पूजा केली जात असून ठिकठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यंदा गरब्याच्या मंडपावरून मध्य प्रदेश सरकारने (Madhya Pradesh) काही कठोर निर्देश जारी केले आहेत. भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. आमच्या धार्मिक कार्यक्रमात मुस्लिम समुदायांनी प्रवेश करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

देशभरात यंदा गरब्याचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून विशेषतः गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कोलकाता याठिकाणी मोठमोठ्या गरबा रासचे आयोजन करण्यात आले आहे. गरब्याच्या ठिकाणी होणारी गर्दी आणि धार्मिक कार्यक्रम लक्षात घेता मध्यप्रदेश सरकारने काही नियम जारी केले आहे. गरबा मंडपातील एंट्रीपासून ते सुरक्षेपर्यंतच्या विविध मुद्द्यावर जिल्हा प्रशासनाला मध्यप्रदेश सरकारकडून गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. या शिवाय मध्य प्रदेशातील भाजपचे नेते सुद्धा मंडपातील प्रवेशावरून सातत्याने प्रतिक्रिया देत आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या प्रतिक्रियेनंतर भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (MP Sadhvi Pragya Singh Thakur) यांनीही धक्कादायक विधान केलं आहे.

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर म्हणाल्या कि, गरबा मंडपात आयडी चेक करूनच सर्वांना प्रवेश दिला पाहिजे. मंडपात मुस्लिम समुदायाला प्रवेश दिला जाऊ देऊ नये. आम्हाला आमची पूजा पद्धती शुद्ध ठेवायची आहे. आमच्या धार्मिक कार्यक्रमात मुस्लिम समुदायांनी तयार केलेली कोणतीही वस्तू असता कामा नये. मंडपाच्या आसपास मुस्लिमांची दुकाने असता कामा नये. त्यांची दुकाने असल्यास त्या दुकानातून सामान खरेदी करू नका, असं धक्कादायक विधान साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केलं आहे. टीव्ही ९ वाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

काही दिवसापूर्वी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गरबा मंडपावरून प्रतिक्रियादेत, माँ दुर्गेच्या आराधनेचं पर्व म्हणजे नवरात्री उत्सव हा आमच्या आस्थेचा विषय आहे. अशा पवित्र दिवशी शांती आणि सौहार्दाचं वातावरण राहिलं पाहिजे. त्यामुळेच मंडपात ओळखपत्रं पाहूनच प्रवेश देण्याच्या आयोजकांना सूचना करण्यात आल्याचं मिश्रा म्हणाले होते. मिश्राच नाही तर पर्यटन मंत्री ऊषा ठाकूर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे. ऊषा ठाकूर यांनी सर्वात आधी यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी हिंदू संघटनांचं समर्थनही केलं होतं. गरबा मंडपात आधार कार्ड पाहूनच प्रवेश दिला पाहिजे, असं त्या म्हणाल्या होत्या.