जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक, स्वच्छता आणि नागरिकांच्या हालचालींवर परिणाम होत असल्याच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने आज मंगळवारी मोठी कारवाई केली. मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने फुले मार्केट परिसरात अचानक धडक मोहीम राबवत गल्लीबोळांमध्ये लपवून ठेवलेल्या हॉकर्सच्या पेट्या आणि साहित्य जप्त करण्याचा सपाटा लावला. या अनपेक्षित कारवाईमुळे अनधिकृत व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

काही दिवसांपूर्वी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज काळे आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी फुले मार्केट परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर बाजार परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात आल्या होत्या.

नगरसेवक रमेश मतानी यांनीही फुले मार्केटमधील वाढत्या अतिक्रमणाबाबत निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महानगरपालिकेने मागील आठवड्यापासून सातत्याने मोहीम सुरू ठेवली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांनी सांगितले की, फुले मार्केट परिसरात हॉकर्सना व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीदेखील काही जण लपूनछपून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा ठिकाणी विशेष मोहीम राबवून साहित्य जप्त करण्यात येत आहे.
दरम्यान, काही ठिकाणी कारवाईदरम्यान विरोधही झाल्याचे समोर आले आहे. मात्र, शहरातील सार्वजनिक रस्ते आणि बाजारपेठा मोकळ्या ठेवण्यासाठी अतिक्रमणाविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे आतापर्यंत सुमारे ३० ते ३५ पेट्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांनी दिली.











