जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२२ । बहीण आणि भावाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी भोजनास गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले, अशी मान्यता आहे. दिवाळीतील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. आज रोजी भाऊबीज आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याही वर्षी बहीण मुक्ताबाईस बंधू ज्ञानेश्वर महाराज व चारही भावंड जन्म संस्थान आपेगाव यांच्याकडील साडीचोळी भाऊबीजेच्या पर्वावर अभिषेक पूजनाने संत मुक्ताबाईस परिधान करण्यात आली. संत परंपरेत बहीण भावाचे नाते जपणाऱ्या या भाऊबीज उत्सवाला पहाटे मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती लावली होती.
दर वर्षी संत परंपरेत बहीण भावाचे नाते जपणाऱ्या या भाऊराया ज्ञानदादा कडून दिला जाणारा या साडी चोळी भेटीचा अमूल्य ठेवा मोठ्या सन्मानाने जपून ठेवला जात भाऊबीजेला संत मुक्ताई यांना मोठ्या भक्ती भावाने परिधान केला जातो.अध्यात्मविवेकी श्री. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज आपेगावकर यांनी जिजासाहेब मिसाळ व सुशीलाताई मिसाळ या दाम्पत्याच्या हस्ते मुक्ताईला ज्ञानदादा कडून आलेली साडीचोळी दरवर्षी परंपरे प्रमाणे याही वर्षी देण्यात आली.
यावेळी शिवाजी महाराज खवणे,एकनाथ नरके,संतोष थोरात,ज्ञानेश्वर मिसाळ,सूर्यकांत काळे,किशोर खोडपे नेरीकर,विवेक कुमावत,मनोहर थोरात,अप्पासाहेब मिसाळ,पांडुरंग औटे, लक्ष्मण वाघमारे,लक्ष्मण कोल्हे,रवि जाधव,भीमराज गाढे,सौ,गाढे,योगेश महाराज सोनने, प्रांजली मिसाळ,आदी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.