जळगाव लाईव्ह न्यूज । आसोदा रेल्वे पूल खचल्यामुळे बायपासवरील वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून, त्यातच काही ठिकाणी अपघातांच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यातच महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि केवळ मलमपट्टी करून चालणार नाही, अशी ठाम भूमिका खासदार स्मिता वाघ यांनी घेतली आहे.

तसेच शहरातील अपघातांना कारणीभूत ठरत असलेले ब्लॅक स्पॉट्स आणि कालिका माता चौक परिसरातील वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी अंडरपास किंवा उड्डाणपूल उभारण्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तातडीने तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

तरसोद ते पाळधी बायपासवरील आसोदा रेल्वे पूल खचला असून त्याची दुरुस्ती सुरू असताना शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर सध्या वाहतुकीचा अतिरिक्त ताण आला आहे. कालिंका माता चौक ते खोटेनगरदरम्यान महामार्गाची झालेली दुरवस्था, विविध ठिकाणी सुरू असलेली कामे आणि बायपासवरील वाहतूक बंद असल्याने वाहन धारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी कालिंका माता चौक परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत असून, या मार्गावरील अपघातांचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
त्यात गेल्या २१ दिवसांत झालेल्या विविध अपघातांत चार जणांचा मृत्यू झाल्याने महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. कालिंका माता चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अंडरपास किंवा उड्डाणपूल यापैकी कोणता पर्याय अधिक प्रभावी ठरेल, याचा तांत्रिक अभ्यास करून डीपीआर तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पुलाच्या कामाची गंभीर दखल घेत, संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. तसेच, या कामात कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि योग्य देखरेख न ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी खासदार वाघ यांनी केली असून याप्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे थेट तक्रार करण्यात आली आहे.
८ ते ९ महिन्यांपूर्वी बायपासवरील कामाच्या दर्जाबाबत तक्रार केल्यानंतर केंद्राचे पथक पाहणीसाठी आले होते; परंतु पथकाने दिलेल्या सूचनांचे पालन न करता कंत्राटदाराने काम सोडून पळ काढला. अंदाजपत्रकापेक्षा ३५% ते ४४% कमी दराने कामे घेतली जात असल्यामुळे गुणवत्तेशी तडजोड होते, असे सांगत अशा निविदांवर शासनाने मर्यादा घातली पाहिजे, असे खासदार वाघ म्हणाल्या.
जळगाव विमानतळाचा विकास आणि कार्गो सेवा
जळगाव विमानतळ इमारत विस्तारासाठी ३५ ते ४० कोटी रुपये मंजूर झाले असून सध्या काम सुरू आहे. धावपट्टीची लांबी १७०० वरून २५०० मीटर करण्यासाठी आलेली रस्त्याची अडचण दूर झाली असून महिनाभरात हे काम मार्गी लागेल, असे खासदार वाघ यांनी सांगितले. विमानतळावर कार्गो सेवा सुरू झाल्यास शेतमाल व औद्योगिक उत्पादनांची जलद वाहतूक होऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.












