जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२६ । मागच्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने उघडदीप दिली आहे. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला असून आजपासून पुढील दोन दिवस जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता. मात्र जिल्ह्याला पूर्णपणे भिजवून काढणाऱ्या मुसळधार पावसासाठी आवश्यक हवामान प्रणाली अद्याप अनुकूल नसल्याचे हवामान अभ्यासकांनी स्पष्ट केले.

हवामानाच्या अंदाजानुसार, २२ ते २३ ऑगस्ट रोजी जळगाव परिसरासह जिल्ह्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या पावसामुळे दमट उकाड्यापासून पूर्णतः सुटका होण्याची शक्यता कमी आहे.

पावसाच्या सरी बरसल्यानंतर काही काळ वातावरणात गारवा जाणवेल. मात्र, पाऊस थांबताच आर्द्रतेचे प्रमाण वाढून पुन्हा उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष जाणवणारा उष्मा अधिक त्रासदायक ठरू शकतो.
या कालावधीत जिल्ह्यात कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी वातावरणात उष्णता आणि दमटपणा कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात व्यापक आणि जोरदार पाऊस होण्यासाठी आवश्यक असलेला आर्द्रतेचा पुरवठा सध्या मर्यादित असल्याचे हवामान अभ्यासकांचे निरीक्षण आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत पावसाच्या सरी अपेक्षित असल्या तरी मुसळधार किंवा सलग पावसासाठी नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.








