जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२५ । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारी यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. त्यात जळगाव शहरासाठी प्रमुख म्हणून आमदार सुरेश भोळे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपने लोकप्रतिनिधींवर जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या प्रभारीपदी मंत्री संजय सावकारे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. तर जळगाव शहरासह जळगाव पूर्व व पश्चिमसाठी स्वतंत्र निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली आहे.

यात जळगाव शहरासाठी प्रमुख म्हणून आमदार सुरेश भोळे, जळगाव पूर्व अर्थात रावेर लोकसभा मतदारसंघासाठी नंदू महाजन तर जळगाव पूर्व अर्थात जळगाव लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. जिल्ह्याचे भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. एकंदर भाजपत निवडणुकीसंदर्भातील निर्णयात आता भोळे, चव्हाण व महाजनांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने शहरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या सर्व पातळ्यांवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून आमदार राजूमामा भोळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राजूमामा भोळे हे लोकसंपर्कात अग्रेसर, तरुण कार्यकर्त्यांशी घट्ट नातं असलेले आणि संघटन बांधणीतील कुशल नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीची तयारी अधिक जोमाने पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










