जळगाव लाईव्ह न्यूज | १० जानेवारी २०२३ | भाजपातील अंतर्गत कलहाचा पहिला अध्याय माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknath Khadse) व मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या रुपात जळगाव जिल्ह्याने पाहिला आहे. खडसे भाजपातून बाहेर पडल्याने हा अध्याय आता संपला आहे. मात्र आता भाजपाचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) भाजपाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यातील राजकीय मतभेद वारंवार समोर येत आहेत. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने मंगेश चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांच्या पराभवासाठी अनेक डावपेच आखले. त्यांच्या पराभवाचे षडयंत्र रचले होते, असा आरोप झाले होते. या संदर्भातील एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नुकत्याच पार पडलेल्या जळगाव दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत उन्मेष पाटील अलिप्त होते. आता तर चाळीसगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत दोन्ही एकमेकांसमोर दोन्ही एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भाजपाचे तत्कालिन नेते एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात भाजपाला रुजवले, हे कुणीही नाकारु शकत नाही. कालांतराने खडसे-महाजन वाद उफाळून आला. मात्र जोपर्यंत खडसे भाजपात होते तोपर्यंत दोन्ही नेत्यांनी पक्षाची मर्यादा पाळत उघडपणे एकमेकांवर टीका केली नाही. भाजपाच्या एका कार्यक्रमात खडसे व महाजन एकाच व्यासपीठावर असतांना खडसे समर्थकांनी महाजन यांच्या विरोधात तर महाजन समर्थकांनी खडसेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी समर्थकांना खडसावत पक्षाची मनमर्यादा सांभाळण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता भाजपाचे नेते उघडपणे एकमेकांवर टीका करु लागले आहेत.
काय घडले राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत?
चाळीसगावातील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचेच आमदार मंगेश चव्हाण आणि खासदार उन्मेष पाटील आमनेसामने आलेले बघायला मिळाले. या दरम्यान खासदार उन्मेश पाटील यांचा माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासोबत फोनवरील संभाषणाचा ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाला होता. खा.उन्मेष पाटील यांनी स्मृतीपॅनलसाठी प्रचार केला. या पॅनलमधून खासदार उन्मेष पाटील यांचे वडिल भैय्यासाहेब पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे वडिलांसाठी खा.उन्मेष पाटील यांनी निवडणुकीत सुरुवातीपासून लक्ष घातले, गेल्या आठ ते पधरा दिवसांपासून ते तालुक्यात वडिलांसाठी तळ ठोकून होते. या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका त्यांनी बजावली. तर विरोधात आमदार मंगेश चव्हाण यांचे विकास पॅनल होते.निवडणुकीच्या दोन दिवसांआधीच आ.चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल करुन, खासदार उन्मेष पाटील यांनी प्रत्यक्षात शाळेच्या जागे विक्री संदर्भात ओढण्याचा प्रयत्न केला. या निवडणुक खासदारांच्या नानासाहेब य.ना.चव्हाण स्मृती पॅनलने १९ पैकी १७ जांगावर दणदणीत विजय प्राप्त केला. तर आमदारांच्या विकास पॅनलचा अक्षरक्ष: धुवा उडवला. विकास पॅनलच्या अवघ्या दोन जागा विजयी झाल्या आहेत.