⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

आ. मंगेश चव्हाण यांनी केली नुकसानीची पाहणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या ओढरे गावासह, शिंदी, गणेशपुर, पिंप्री प्रचा, पाटणा, गोरखपूर आदी गावांना चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामी करून पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या.

चाळीसगाव तालुक्याला गेल्या महिन्याभरात पाच वेळा अतिवृष्टी होऊन महापुराचा फटका बसला आहे. याचा जास्त प्रमाणात तडाखा हा लघु व मध्यम प्रकल्पाच्या लगत असणाऱ्या गावांना बसला असून रस्ते, पाईपमोरी, छोटे पूल वाहून जाने, वीज पुरवठा खंडित होऊन गावाचा संपर्क तुटणे, नदी व सांडव्यालगत असणाऱ्या जमिनी खरडुन जाने, अश्या प्रकारे मोठ्या नुकसानीचा सामना ग्रामस्थ व शेतकऱ्यांना करावा लागला आहे. ओढरे ते गणेशपुर रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहामुळे ओढरे येथील लघु पाटबंधाऱ्याच्या सांडव्यातून जास्त प्रमाणात पुराचे पाणी आल्याने रस्त्यावरील पाईप मोरी वाहुन गेली व तीन ठिकाणी रस्ता कोरला गेला आहे. शेतीचे देखील मोठे नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी ओढरे गावातील कार्यकर्त्याच्या बुलेटवर स्वार होत शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली.

अधिकाऱ्यांना सूचना
यावेळी माजी जि.प. सदस्य शेषराव बापू पाटील, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, कैलास पाटील, ओढरे सरपंच जगन पवार, बळीराम पवार, निवृत्ती कवडे, संजय हजारे, विलास जाधव, ठाकुरसिंग पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, झालेल्या नुकसानीबाबत आमदार चव्हाण यांनी लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ट अभियंता यांच्याशी संपर्क साधून तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. तसेच महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेला नुकसानीचा पंचनामा करून पाठपुरावा करण्यास सांगितले. या कठीण काळात आमदार म्हणून नव्हे तर तुमचा घरातील सदस्य म्हणून मी नेहमीच सोबत असून गावाचा संपर्क सुरळीत करण्यासाठी व नुकसानीची जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन आमदार चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांना केले.